पुणे

धक्कादायक! पोहताना दमछाक होऊन युवकाचा मृत्यू ; चासकमान धरणात सापडला मृतदेह

Laxman Dhenge

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : धामणगाव बुद्रुक(ता. खेड) येथे चासकमान धरणात पोहताना दमछाक होऊन मृत्यू पावलेल्या नितीन दत्तात्रय खंडागळे(वय 32, रा. शेंदूर्ली, ता. खेड) याचा मृतदेह बुधवारी(दि.20) दुपारी एनडीआरएफ च्या जवानांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढला. शेंदूर्ली येथील नितीन खंडागळे हा सोमवारी (दि. 18) धामणगाव बुद्रुकच्या हद्दीत चासकमान धरणात पोहत असताना दमछाक झाल्याने बुडाला होता. नागरिकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा मृतदेह मिळाला नव्हता. भीमा नदी पात्र खोल असल्याने त्याचा शोध लागला नाही. नदीपात्रात गाळ साचल्याने तो खाली गाळात अडकून पडला होता. प्रशासनाने याबाबत तत्काळ दखल घेतली नव्हती.

नातेवाईकांच्या मागणी नंतर सोमवारी (दि.20) आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या कार्यालयाशी संपर्क करून पथक मागवले. या पथकातील सुरेंद्र कुमार, उमेश भालेराव, मुरलीधर ढवळे,आशीष देवदास, रुपेश आगम, हरेश्वर घुले, सुभाष सणस, कपिल मोहन, संतोष ठाकरे, महेश देसाई, निर्भय कुमार सिंह, रतलावत काशीनाईक, शरयू साळुंखे,दत्तात्रय पाटील, राहुल वाघ, देवेंद्र कुमार यांनी अत्याधुनिक बोटीतून लाटा निर्माण करून नितीन खंडागळे याचा मृतदेह गाळातून बाहेर काढला.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या कुटुंबाने हंबरडा फोडला. नदी किनारी स्थानिक ग्रामस्थानी मोठी गर्दी केली होती. चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांतर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चास कमान धरण जलसाठ्याजवळील गावामधील तरुणांना आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा घटना घडल्या तर तात्काळ मदत कार्य करण्यास सोयीचे होईल असे एनडीआरएफचे जवान हरेश्वर घुले यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT