पुणे

धक्कादायक! पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला; अशी घडली घटना

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पहाटेच्या वेळी तरुणीने आपल्या प्रियकाराला घरी बोलावून घेतले. त्या वेळी तिची आई गादीवर झोपली होती. तिने घरातील हातोडा प्रियकराच्या हातात दिला. त्याने क्षणाचाही विलंब न करता तो हातोडा तरुणीच्या आईच्या डोक्यात मारला. वेदनेने कळवळून आईने ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी मुलीने स्कार्फने तिचे तोंड दाबले. काही क्षणात आई कायमची झोपली.
पुण्यातील वडगाव शेरी परिसरात प्रियकराच्या मदतीने मुलीने आपल्याच आईच्या डोक्यात होताडा घालून स्कार्फच्या साहाय्याने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एवढेच नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी महिलेचा खून केल्यानंतर ती बाथरूमध्ये घसरून पडली आणि तिच्या डोक्याला नळ लागला, असा बनाव रचला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात तिने आईच्या परस्पर तिच्या बँक खात्यावरून मित्राला ऑनलाईन पैसे पाठविले. ते पैसे वेळोवेळी काढले अन् खर्चही केले. पण, घटनेच्या दिवशी अचानक आई बँकेत जाऊ आणि पैसे काढू, असे म्हणू लागली अन् आता आपण पैसे काढत असल्याचे आईला कळणार आणि ती रागवणार या भीतीने मुलीने हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे.
मंगल संजय गोखले (वय 45, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलगी योशिता संजय गोखले (वय 18) आणि तिचा प्रियकर मित्र यश मिलिंद शितोळे (वय 24, रा. गणेशननगर) यांना अटक केली आहे. याबाबत विनोद शाहू गाडे (वय 42, रा. चेंबूर, गोवंडी रोड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 1 एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास चित्रलेखा निवास, राजश्री कॉलनी, लेन क्रमांक दोन, वडगाव शेरीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोखले कुटुंबीय मूळचे चेंबूरचे. गेल्या काही वर्षांपासून मंगल या मुलीला घेऊन पुण्यातील वडगाव शेरीत राहत होत्या. मंगल या घरकाम करत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. योशिता हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. यश शितोळेचे आयटीआयचे शिक्षण झाले आहे. या दोघांची गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.

दरम्यान, मंगल गोखले या काम करून पैसे जमा करत असत. त्या बँकेत पैसे ठेवत होत्या. याची माहिती मुलगी योशिता हिला होती. तिने मित्राला आणि तिला पैशाची आवश्यकता भासल्यास आईच्या बँक खात्यातून मित्र यश याच्या खात्यावर टाकत होती. तेथून ते पैसे काढून घेत. आईच्या बँक खात्यातूनही तिने वेळोवेळी चेकद्वारे पैसे काढले होते. काही महिन्यांत दोघांनी एक ते दीड लाख रुपये काढले होते. 1 एप्रिल रोजी योशिताला आईने पैशांची गरज आहे. उद्या आपण बँकेत जाऊ आणि पैसे काढू असे सांगितले. हे ऐकून योशिता घाबरली. तिला आपण आईच्या खात्यातून पैसे काढल्याची माहिती होणार आणि ती रागवणार, याची भीती वाटू लागली होती, त्यामुळे त्यांनी असे कृत्य केले.

असा काढला काटा

योशिताने 1 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजता याबाबतची माहिती यश याला दिली. त्याने आईला जिवे ठार मारू, असे सांगितले. मात्र, योशिताचा मावसभाऊ प्रणय हा मुंबईहून त्यांच्याकडे आला होता. तो घरात झोपल्याचे योशिताने यशला सांगितले. पहाटे पावणेचार वाजता यश हा योशिताच्या मोबाईलवर फोन करून प्रणय याला खाली बोलावून घेतले. साडेपाच वाजता यश एकटाच योशिताच्या घरी आला. त्या वेळी मंगल या गादीवर झोपल्या होत्या. योशिताने घरात ठेवलेला हातोडा यशच्या हातात दिला. त्याने तो मंगल यांच्या डोक्यात घातला. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत योशिताने स्कार्फच्या साहाय्याने त्यांचे तोंड दाबले. मंगल यांचा मृत्यू झाल्यानंतर यश तेथून निघून गेला.

पोलिसी नजरेनं अचूक हेरलं

योशिताने रचलेल्या कहाणीबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांना सुरुवातीपासूनच संशय होता. मंगल यांच्या डोक्यात झालेली जखम त्या पडल्याची खात्री देत नव्हती. त्यांनी योशिताला विश्वासात घेऊन चौकशी केली. मात्र, ती असे काही घडल्याचे सांगत नव्हती. दुसरीकडे नातेवाइकांकडे चौकशी केली, तर त्यांनी देखील आमचा कोणावर संशय नसल्याचे सांगितले. पोलिसांना तसे लेखीदेखील दिले. मंगल यांच्या उत्तरकार्यासाठी योशिता आणि तिचे सर्व नातेवाईक मुंबईला गेले होते. पाटील यांचे मन काही केल्याने ते मानायला तयार नव्हते. त्यांनी मंगल यांच्या नातेवाइकांना परत योशिताकडे विचारपूस करण्याची विनंती केली. त्या वेळी तिने कबूल केले. मात्र, कोणी आणि कसे केले हे सांगत नव्हती. पाटील यांनी योशिताला पुण्यात घेऊन येण्यास सांगितले. त्या वेळी तिने आईचा खून केल्याची कबुली दिली.

तरुणीने प्रियकराच्या साथीने आपल्या आईचा डोक्यात हातोडा घालून स्कार्फच्या साहाय्याने तोंड दाबून खून केला. पाय घसरून पडल्याचा बनाव रचला होता. मात्र, तपासात दोघांनी खून केल्याचे समोर आले. तरुणीने आईच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले होते. आईला कळाले, तर ती रागवेल म्हणून तिने आईचा खून केला. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

-मनीषा पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT