Shivneri Fort Stampede Shivaji Jayanti Pune Pudhari
पुणे

Shivneri Fort Video: शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरीसदृश घटना; महिला- मुलांसह अनेक जण जखमी, परिस्थिती नियंत्रणात

Shivneri Fort Stampede: पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

Rahul Shelke

Shivneri Fort Stampede Shivaji Jayanti Pune: पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. या घटनेत महिला आणि लहान मुलांसह अनेकजण जखमी झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शिवभक्तांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ल्यावर दर्शन, पूजा आणि विविध कार्यक्रमांसाठी हजारो शिवभक्त पहाटेपासूनच दाखल झाले होते.

रात्रीपासूनच शिवज्योत घेऊन येणारे कार्यकर्ते, विविध संघटनांचे सदस्य आणि भाविक किल्ल्यावर जमा होऊ लागले होते. सकाळ होताच गर्दीचा ओघ वाढला. 'पुढारी न्यूज'च्या वृत्तानुसार किल्ल्याच्या अरुंद पायऱ्या, हत्ती दरवाजा आणि अंबरखान्याखालील गणेश दरवाजा या मार्गांवर एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

काही लोक रांग सोडून किल्ल्याच्या जीर्ण भिंतींवरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. याच गोंधळात अचानक गर्दीचा जोर वाढला आणि काही लोक घसरले. त्यानंतर काही क्षणांतच चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. शिवज्योत आणि भगवे झेंडे घेऊन आलेले लोक एकमेकांवर आदळू लागल्याने अनेकांना श्वास घ्यायलाही त्रास झाला.

तिरिक्त पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने किल्ल्यावर दाखल करण्यात आल्या. जखमींना त्वरित जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार बहुतेक जखमींना किरकोळ दुखापती झाली असून काहींना दम लागणे, चक्कर येणे आणि हात-पायाला मार लागला आहे. सर्वांवर उपचार सुरू असून बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, प्रशासनाने किल्ल्यावर प्रवेशासाठी मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही तास एकाच वेळी ठरावीक संख्येतील भाविकांनाच प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आले आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर करण्यात येत आहे.

या घटनेमुळे शिवजयंतीसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आधीच अधिक काटेकोर नियोजनाची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ऐतिहासिक वास्तूंमध्ये वाढती गर्दी, अपुरा बंदोबस्त आणि समन्वयाचा अभाव यामुळे अशा दुर्घटना घडण्याचा धोका असतो. सुदैवाने या वेळी मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक भाविकांना दुखापतींना सामोरे जावे लागले. प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आणि सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT