Pune News : अधिकारी कोपऱ्यात का बसतात? खेड तहसील कार्यालयात 'दस्त नोंदणी'साठी चिरी-मिरीच्या चर्चांना ऊत

खेड तहसील कार्यालय आवारातील दस्त नोंदणी कार्यालयात कोपऱ्यात बसून काम केले जात आहेत.
खेड तहसील कार्यालय आवारातील दस्त नोंदणी कार्यालयात कोपऱ्यात बसून काम केले जात आहेत.
Published on
Updated on

राजगुरुनगर : खेड तहसील कार्यालयात दस्त नोंदणी करायची म्हणजे सर्वसाधारण नागरिकांसाठी 'नरक यात्रा'! कार्यालयात मुख्य हॉलमध्ये मोठ्या टेबलांवर बसण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचारी 'कोपऱ्यात' का बसतात ? याचे उत्तर मिळेनासे झाले आहे. कारण कोपऱ्यात बसल्याने 'खालील हात' व्यवहार अगदी सहज आणि नजरेआड होतो, अशी चर्चा तहसील कार्यालयात जोर धरून आहे.

खेड तहसील आवारात दस्तानोंदणी कार्यालय आहे. अगोदरच अत्यंत कमी आणि अडगळीच्या जागेत हे कार्यालय सुरू आहे.सकाळी १० वाजता कार्यालय उघडते, तोवर बाहेर रांगा लागलेल्या असतात. त्यात वयोवृद्ध शेतकरी, महिला आणि दिव्यांग व्यक्ती असतात. आत गेल्यावर मात्र 'साहेब' कोपऱ्यातील छोट्या खोलीत किंवा पडद्यामागे बसलेले असतात. फाइल घेऊन गेल्यावर प्रथम 'चिरी-मिरी' सुरू होते.

खेड तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराची ही चिरी-मिरी आता इतकी फोफावली आहे की नागरिक एकमेकांना 'कोपऱ्यातील दर' सांगत आहेत. 'म्युटेशन ७ ते ८ हजार, सेल डीड १० ते १५ हजार, नाव बदल ५ हजार' हे दर अगदी 'स्टँडर्ड' झाले आहेत.

कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानेही आपले नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले, 'साहेबांना कोपरा आवडतो कारण तिथे CCTV चा अँगल नाही, फाइल पटकन घेता येते आणि पैसेही पटकन मिळतात. मुख्य हॉलमध्ये बसलो तर लोक पाहतात, फोटो काढतात. कोपऱ्यात सेफ राहून सगळे साध्य होते!'

नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात येथील कार्यालयात ४०० हून अधिक दस्त नोंदणी झाली. त्यातील ७० टक्के प्रकरणांत 'अंडर द टेबल' व्यवहार झाल्याचे बोलले जाते. तरीही तहसीलदार कार्यालयात 'सर्व काही ठीक' असे सांगितले जात आहे. 'आम्ही ऑनलाइन सिस्टम आणली आहे,' असे म्हणतात, पण प्रत्यक्षात 'ऑफलाइन कोपरा सिस्टिम' अधिक सक्रिय झाली असल्याचे चित्र येथे दिसत आहे. साधा दस्त नोंदवण्यासाठीही खेडवासियांना 'कोपऱ्यातील कर' द्यावा लागत असल्याचे बोलले जाते. कोपऱ्यातील करामुळे काही न होणारे किंवा नियमात न बसणारे व्यवहार नोंदवले जातात, असे सांगितले जाते.

तहसील कार्यालयात सर्व कामे मुख्य हॉलमध्ये, सीसीटीव्ही अंतर्गत प्रत्येक फाइलची ऑनलाइन ट्रॅकिंग अनिवार्य करण्यात आली आहे; मात्र कोपऱ्यात बसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कार्यालयातील एका ठिकाणी बसल्यामुळे दस्त नोंदणी पुर्वी कागदपत्रांची तपासणी व्यवस्थित करता येते. जागा कमी आणि नियमितपणे गर्दी असल्याने मुळ ठिकाणी खुप गोंधळ असतो. बाजुला बसण्याचा इतर कोणत्याही प्रकाराचा उद्देश नाही.

- श्रीमती व्ही. व्ही. पोळ, दुय्यम निबंधक, खेड कार्यालय क्र. १

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news