किल्ले शिवनेरीला दोन हजार वर्षांचा इतिहास  
पुणे

Shivneri Fort: किल्ले शिवनेरीला दोन हजार वर्षांचा इतिहास

’युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळाच्या नामांकनाने जगात मिळाली ओळख

पुढारी वृत्तसेवा

अमोल गायकवाड

जुन्नर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीसह 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) नामांकन मिळाल्याने या गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर ओळख मिळाली आहे.

किल्ले शिवनेरीला 2 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. सातवाहन कालखंडामध्ये शिवनेरी किल्ला म्हणून प्रसिद्ध नसला, तरी सातवाहन राजांनी बौद्ध भिक्खूंसाठी सर्वाधिक बुद्धलेणी किल्ले शिवनेरीच्या कुशीमध्ये कोरून घेतली आहेत. परदेशी व्यापार्‍यांनी देखील लेणी कोरण्यासाठी दान दिल्याचा उल्लेख येथील शिलालेखातून आजही आढळून येतो. (Latest Pune News)

किल्ले शिवनेरीचा सातवाहन, अभिर, सिंद, शिलाहार, यादव, बहमनी, निजामशाही, मुघल, मराठे आणि इंग्रज इत्यादी राजवटींचा संबंध आला. यादवांच्या पाडावानंतर शिवनेरीवर मुस्लिम शासकांची राजवट होती. शहाजीराजांच्या राजवटीत त्यांचे जुन्नरवर आधिपत्य होते. शिवनेरीचा किल्ला म्हणून वापर यादव कालखंडात सुरू झाल्याचे म्हटले जाते.

सातवाहन ते पेशवेकाळापर्यंत विविध राजवटींच्या स्थापत्यशास्त्राची विविधता किल्ल्याच्या बांधकामामध्ये आढळून येते. इ. स. 1443 मध्ये बहमनी सरदार मलिक-उत-तुजारने हा गड जिंकून घेतला. इ. स. 1486 ला मलिक अहमदने निजामशाही स्थापन करून शिवनेरी गडाला निजामशाहीची पहिली राजधानी बनवली. छत्रपती शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे जुन्नरला आल्यावर त्यांचे जेष्ठ चिरंजीव संभाजी व शिवनेरीचे किल्लेदार विश्वासराज यांची कन्या जयंती यांचा विवाह किल्ले शिवनेरीवर झाला.

हा कालखंड शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये धावपळीचा असल्याने या काळात त्यांनी पत्नी जिजाबाई यांना गरोदरपणाच्या काळात सुरक्षित ठिकाण म्हणून किल्ले शिवनेरीची निवड केली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाबाई यांच्या पोटी शिवरायांचा किल्ले शिवनेरीवर जन्म झाला.

शिवनेरीवर अनेक ऐतिहासिक प्रमुख वास्तू आहेत. त्यामध्ये शिवजन्मस्थान ही सर्वाधिक महत्त्वाची वास्तू दोन मजल्यांची असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला. या वास्तूचा जीर्णोद्धार इ. स. 1925 मध्ये करवीर छत्रपती व भास्करराव जाधव यांनी केला. गडावर शिवाईदेवीचे मंदिर आहे.

अंबरखाना, शिवस्मारक, कमानी मस्जिद, सरकारवाड्याचे अवशेष, पुष्करणी, बदामी तलाव, कारागृह व कडेलोट टोक, घुमट, ईदगाह अशा वास्तू आहेत. शिवनेरी किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 141.24 हेक्टर आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 97.50 टक्के क्षेत्र वन विभागाकडे आणि 2.50 टक्के क्षेत्र भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.

महंमद कासीम फरिश्ता या पर्शियन इतिहासकाराने किल्ले शिवनेरीचा ‘सुनेरे’ असा उल्लेख केला असून, जुन्नर शहरास जुनागढ या नावाने संबोधले आहे. 1675 मध्ये डॉ. जॉन फ्रायर हा इंग्रजी प्रवासी जुन्नरला आला होता. त्याने शिवनेरी किल्ल्याचे जुन्नरचा गड किंवा जुन्नरचा डोंगर असे वर्णन केले आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा मॉडेल फोर्ट म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे. देदीप्यमान ऐतिहासिक परंपरा, ऐतिहासिक वास्तू, लेणी आणि लेण्यांमधील शिलालेख, दुर्मीळ वनस्पती या किल्ल्यावर आढळतात. सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान शिवनेरीचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला. गडकोटांचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे. आता आपल्या स्थानिकांची जबाबदारी वाढली आहे.
- प्रा. लहू गायकवाड, इतिहास अभ्यासक
किल्ले शिवनेरीस जागतिक वारसास्थळाचे नामांकन प्राप्त होणे ही निश्चितच गौरवास्पद, स्वागतार्ह आणि आनंदाची बाब असली तरी यामुळे सर्वांची जबाबदारी वाढली आहे.
- बाबासाहेब जंगले, संरक्षक सहाय्यक, पुरातत्व विभाग, जुन्नर
युनेस्कोकडून शिवनेरीसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्याने छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासाला जागतिक पटलावर मानाचे स्थान मिळाले असून, भारताची मान जगात उंचावली आहे.
- शरद सोनवणे, आमदार, जुन्नर तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT