

पुणे: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूल, साकव, जाहिरात फलक तसेच उड्डाण पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील पूल व भुयारी मार्गांचे ऑडिट करून अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
या अहवालानुसार, शहरात एकूण 90 बांधकाम रचना असून त्यातील 40 चे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. यामध्ये एक धोकादायक रेल्वे उड्डाण पूल आणि एक कॉजवे यापूर्वीच पाडण्यात आला आहे. उर्वरित 38 बांधकामांची दुरुस्ती करावी लागणार असून, या कामांचा सुमारे 70 टक्के भाग पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Latest Pune News)
कुंडमळा दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी सात दिवसांत सर्व संबंधित यंत्रणांकडून तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद, रेल्वे, जलसंपदा विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ व पीएमआरडीए या संस्थांकडून अहवाल प्राप्त झाले होते, मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे अहवाल बाकी होते.
पुणे महापालिकेचा अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला प्राप्त झाला आहे.महापालिकेच्या प्रकल्प विभागाने सादर केलेल्या अहवालात नदीवरील पूल, उड्डाण पूल, रेल्वे उड्डाण पूल, पादचारी व वाहन भुयारी मार्ग, पादचारी उड्डाण पूल व कॉजवे अशा विविध प्रकारच्या 90 बांधकाम संरचना नमूद आहेत. यातील 25 वर्षांपेक्षा जुने असलेल्या 38 बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे.
यापैकी प्राधान्यक्रमातील 11 पुलांची कामे प्रकल्प विभागामार्फत सुरू असून 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सर्व कामांसाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. या कामांसाठी अंदाजपत्रकात 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सर्व अधिकृत होर्डिंग सुस्थितीतशहरातील 2 हजार 640 अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, आकाशचिन्ह विभागाकडे मान्यता असलेली ही सर्व होर्डिंग तपासणीत सुस्थितीत आढळली आहेत.
दोन पूल धोकादायक; पाडण्यात आलेमहापालिकेने शहरातील साधू वासवानी रेल्वे उड्डाण पूल आणि वृद्धेश्वर येथील नदीवरील कॉजवे हे धोकादायक स्थितीत असल्याने यापूर्वीच पाडले आहेत.