पुणे

शिवरायांच्या जलव्यवस्थापनाचा वारसा दुर्लक्षित; राजगडाच्या तळ्यातील पाणी दूषित

Laxman Dhenge

खडकवासला : राजगड किल्ल्यावरील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा वारसा असलेल्या तळ्याकडे
पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष होत आहे. तळ्यात मुबलक पाणी आहे. मात्र, स्वच्छतेअभावी तळ्यातील पाणी दूषित झाले आहे. घोटभर पाण्यासाठी पहारेकर्‍यांसह पर्यटकांना निमुळत्या कातर खडकात दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. राजगडाच्या पायथ्याला पाणीटंचाई असताना ऐन उन्हाळ्यात राजगड किल्ल्यावरील तळ्यात मुबलक पाणी आहे. मात्र, तळ्यातील पाणी सध्या दूषित झाले आहे. विकतच्या पाण्यावर पर्यटकांना तहान भागवावी लागत आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पॅकबंद पाण्याचे दर वाढवले आहेत. एक लिटर पाण्याची बाटली पन्नास रुपयांना विकली जात आहे.

गडावर मुबलक प्रमाणात पाणी आहे. मात्र, तळ्यांची स्वच्छता, शुध्द पाणीपुरवठा आदीकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे. सर्वात गंभीर स्थिती गडावर मुक्कामी राहणार्‍या पुरातत्व खात्याच्या पाहरेकर्‍यांची आहे. सायंकाळी पाचनंतर गडाचे दरवाजे बंद करून पहारेकरी मुक्काम करतात. पहारेकर्‍यांना स्वयंपाकासाठीही पाणी नाही, अशी गंभीर स्थिती सध्या निर्माण झाली आहे. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील चंद्रकोर तळ्यात, तसेच पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिराजवळील तळ्यात मुबलक प्रमाणात पाणी आहे. मात्र, या तळ्यातील पाणी हिरवेगार शेवाळयुक्त होऊन दूषित झाले आहे. पद्मावती मंदिराजवळील दोन्ही टाक्यातील पाणी संपले आहे. छत्रपती शिवरायांच्या राजसदरेच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या राणीवसा तळ्यातील झर्‍यातील पाणी आणण्यासाठी पहारेकर्‍यांसह पर्यटकांना अक्षरश: मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. रात्रभर केवळ चार- पाच लिटर पाणी झर्‍यात जमा होते, त्यावर पहारेकरी तहान भागवत आहेत.

पहारेकर्‍यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ

पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे म्हणाले, 'पद्मावती मंदिराच्या शेजारी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या दोन्ही टाक्यातील पाणी संपले आहे. त्यामुळे पद्मावती तलावातील हिरवे पाणी पित आहे.' पवन साखरे म्हणाले की, दूषित पाण्यामुळे गडावर मुक्काम करणे गैरसोयीचे झाले आहे, वारंवार आजारी पडत आहे.

राजगड किल्ल्यावरील तळ्यात मुबलक पाणी आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गडावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यातील पाणी उन्हाळ्यात संपते. त्यामुळे इतर तळ्यांतील पाण्याचे शुद्धिकरण करून ते पिण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे.

– डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT