पुणे: शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालय परिसरात दोन महिला वकिलांमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत एका वकिलाच्या डोक्याला टोकदार वस्तूने मार लागून जखम झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी वकील (42, रा. भवानी पेठ) या गेल्या दीड वर्षांपासून मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर येथे वकिली करीत आहेत. त्यांचा आरोप आहे की, न्यायालयीन प्रकरणे जास्त प्रमाणात मिळत असल्याच्या कारणावरून दोन महिला वकिलांशी त्यांचे यापूर्वी वाद झाले होते.
दरम्यान, दि. 24 फेबुवारी रोजी सकाळी त्या न्यायालयात कामासाठी आल्या असता, संबंधित दोन वकिलांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दिवसभर त्या त्यांच्या मागे फिरत “आज कुणालाही काम करू देणार नाही, पैसे कमवू देणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर दुपारी पुन्हा वाद वाढला.
तक्रारदार न्यायालयाबाहेर पडत असताना एका आरोपीने पाठीवर बुक्की मारली. त्यानंतर दोघींमध्ये झटापट झाली. केस ओढणे, हातघाई अशी मारहाण झाली. त्या वेळी दुसऱ्या महिला वकिलानेही मारहाण केल्याचा आरोप आहे. झटापटीदरम्यान एका वकील महिलेने टोकदार वस्तूने डोक्यावर वार केल्याने फिर्यादींच्या डोक्याला जखम झाली व रक्तस्राव सुरू झाला.
त्यांना चक्कर आल्याने सहकाऱ्यांनी आधार दिला. न्यायालयातील नर्सकडून प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना रास्ता पेठ येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.