Pune Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav: शिवाजीनगरात देखाव्यांची पर्वणी; गड-किल्ल्यांपासून स्वामी समर्थांच्या जीवनकार्यापर्यंत; इतिहास-धर्माचा जागर

जिवंत देखावे, भव्य प्रतिकृती अन् आकर्षक रोषणाई; गणेशभक्तांची देखावे पाहण्यासाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कुठे वीरभद्र अवतारातील महादेव-सती विवाहाचा प्रसंग... कुठे स्वामी समर्थांच्या जीवनकार्याची अनुभूती... तर कुठे राजगड, शिवनेरी, प्रतापगडासह मराठ्यांच्या गड-दुर्गांचा जाज्वल्य इतिहास... लोकमान्य टिळक आणि चापेकर बंधूंच्या क्रांतिकारी पर्वापासून नरसिंह अवतार आणि विठ्ठल मंदिरापर्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक देखाव्यांची पर्वणी यंदा शिवाजीनगर परिसरात पाहायला मिळत आहे. जिवंत देखावे, भव्य प्रतिकृती आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे गणेशोत्सवाचा उत्साह आणखी खुलला असून, हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

श्री शिवाजीनगर गावठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा जिवंत देखावा सादर केला आहे. स्वामी समर्थांच्या जीवनकार्य देखाव्यांद्वारे दाखविण्यात आले आहे. शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वीरभद्र अवतारातील महादेव आणि सती यांच्या विवाहाचा जिवंत देखावा साकारला आहे. शिव-शक्तीच्या पवित्र मिलनाचे महत्त्व यातून अधोरेखित करण्यात आले आहे.

देखाव्यातून मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा

श्री ज्ञानेश्वर मित्र मंडळ ट्रस्टने 'गौरव गाथा गड-दुर्गांची' या देखाव्यातून मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव अभिनव मित्र मंडळ ट्रस्टने १८९६ मधील गणेशखिंड प्रकरणावर आधारित ऐतिहासिक जिवंत देखावा उभा केला आहे. लोकमान्य टिळक, ब्रिटिश अधिकारी आणि चापेकर बंधू यांच्यातील संवादातून तत्कालीन परिस्थिती आणि क्रांतिकारी इतिहास गणेशभक्तांसमोर उलगडण्यात आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील सुदर्शन मित्र मंडळाने (संस्था) आकर्षक आणि भव्य राधाकृष्ण महलाचा देखावा साकारला आहे.

श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने विठ्ठल मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मूर्तींमुळे या देखाव्याला वारकरी परंपरेचा साज चढला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 'नरसिंह अवतार' रथ, गोखलेनगरमधील शिवप्रताप मित्र मंडळ ट्रस्टने आकर्षक महादेव रथ, नरवीर तानाजी तरुण मित्र मंडळाने 'बालाजी महाल' साकारला आहे. मृत्युंजय मित्र मंडळ ट्रस्ट, नटराज तरुण मित्र मंडळ तसेच वाकडेवाडी येथील अखिल छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव मित्र मंडळाने गाण्यांवर नाचणारी विद्युतरोषणाई साकारली आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाशेजारील विष्णुकृपा तरुण मंडळ आकर्षक महादेव रथ साकारला आहे. नरवीर तानाजी वाडी येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाने आकर्षक सजावट केली आहे. अखिल शिवाजीनगर पोलिस वसाहत युवक मित्र मंडळाने 'राजमुद्रा महाल' उभारला आहे.

आवर्जून पाहावे असे देखावे

  • ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज - श्री शिवाजीनगर गावठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट: रोकडोबा मंदिर

  • वीरभद्र अवतार - शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक (बालगंधर्व चौक)

  • नृसिंह अवतार - श्री गुरुदत्त तरुण मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट - दीपबंगला चौक

  • राधाकृष्ण महल - सुदर्शन मित्र मंडळ संस्था - फर्ग्युसन कॉलेज समोर

  • कर्नाटक येथील विजय विठ्ठल मंदिर - नवचैतन्य मंडळ - डेक्कन

  • मदुराई येथील मीनाक्षी मंदिर - श्री शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - पुणे महापालिकेसमोर

  • मुंबईच्या राजाची भव्य प्रतिकृती - श्री पंचमुखी मारुती मित्र मंडळ - श्री छत्रपती शिवाजीनगर गावठाण तालीम

  • राधाकृष्ण महल - सुदर्शन मित्र मंडळ (संस्था) - फर्ग्युसन रस्ता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT