पुणे: शिवाजीनगर एसटी स्थानकाचा पीपीपी तत्त्वावर पुनर्विकास करून विकसित नवा डेपो आम्हाला हस्तांतरित करावा, अशा सूचना आम्ही ‘महामेट्रो’ला केल्या आहेत, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (दि. 15) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काही वर्षांपूर्वी भूमिगत शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे काम करण्यासाठी येथील एसटी डेपो वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आला होता. आता शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होऊन बराच कालावधी उलटला आहे. त्याजागी मेट्रोकडून एसटी डेपो विकसित करून दिला जाणार होता. (Latest Pune News)
मात्र, सध्या एसटीची जागा पडून आहे. येथे डेपो पुनर्विकासाचे काम सुरू होण्याची अद्याप चिन्हेच दिसत नाहीत. परिणामी, नागरिकांना प्रवासासाठी शहराबाहेर वाकडेवाडी येथे जावे लागत आहे.
त्याबाबत मंत्री सरनाईक यांना विचारणा केली असता त्यांनी शिवाजीनगर एसटी स्थानकाचा विकास मेट्रोच करणार असून, तीन वर्षांच्या आत विकसित झालेला डेपो एसटी महामंडळाला हस्तांतरित करा, अशा सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनची जागा मेट्रोनेच विकसित करावी, यासंदर्भातील प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी आमच्यासमोर ठेवलेला आहे. महामंडळाच्या आगामी बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल.
‘आरे डेअरी’जवळील डेपोत फूड स्टॉल उभारण्यासाठी चाचपणी
प्रवाशांना खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यासंदर्भात आम्ही आरे डेअरीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहोत. तेथे फूड स्टॉल उभारता येतील का, ते पाहत आहे. स्टॉल उभारता आले तर प्रवाशांची गैरसोय होणार नाही. याव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
स्वारगेट स्थानकाला 48 सीसीटीव्ही बसवणार...
प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही स्वारगेटला सीसीटीव्ही बसवले आहेत. ते सर्व सुस्थितीत आहेत. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी 48 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले.