पुणे: हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवप्रेमींच्या विरोधानंतर हा पुतळा पुन्हा हवेली तहसील कार्यालयात पुनर्प्रस्थापित करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि शिवप्रेमी उपस्थित होते. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वी होता, त्याच ठिकाणी तो पुन्हा बसवला नाही, तर आंदोलन सुरू राहील, असा इशारा शिवप्रेमींनी दिला होता.
हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्प्रस्थापित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खडकमाळ येथे नवीन प्रशासकीय भवनाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जुन्या प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांचे नवीन इमारतीत स्थलांतर सुरू आहे.
त्यानुसार हवेली तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे स्थानांतर करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 15 नोव्हेंबर रोजी सदर पुतळा डागडुजीसाठी आणि पुढील स्थापनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्यात आला होता.
दरम्यान, 17 नोव्हेंबर रोजी शिवप्रेमी संघटनांनी पुतळा स्थलांतरासंबंधी आक्षेप नोंदवला. जनभावनांचा आदर राखण्यासाठी आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पुतळा पुन्हा हवेली तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पूर्ववत स्थापित करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.