सुरेश वाणी
नारायणगाव : राज्यात दोन शिवसेनेमध्ये जोरदार वाद सुरू असताना दुसरीकडे जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्रित निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राज्यपातळीवरील नेते याला कितपत पाठिंबा देतात, त्यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.
आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख देखील उपस्थित होते. पिंपळवंडी गटातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार मंगेश काकडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून हातामध्ये धनुष्यबाण घ्यावे, असा आ. सोनवणे यांचा आग््राह असून, या बदल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांच्या पत्नीला बोरी गटातून मशाल चिन्हावर उभे करून त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो, असाही प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ओतूर व बारव हे दोन गट देखील देण्याचा प्रस्ताव या बैठकीत शिवसेनेकडून ठेवला असल्याचे समजते. या दोन्ही गटांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे उमेदवारच नसल्यामुळे त्यांना हा प्रस्ताव मान्य नसल्याचे समजते. यावर उपाय म्हणून ओतूर गटासाठी शिवसेनेच्या एक महिला उमेदवाराला उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश देऊन मशाल चिन्हावर उभे करण्याचा प्रस्ताव देखील या बैठकीत चर्चिला गेल्याचे समजते.
जुन्नर तालुक्यातील या दोन शिवसेनेच्या चर्चेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मान्यता मिळण्याची शक्यता अजिबात नसून जर तालुकास्तरावर कार्यकर्त्यांनी असा काही निर्णय घेतला, तर एबी फॉर्म दिले जाणार नाहीत, अशी तंबी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.