कोथरूड पुन्हा उबाठा शिवसेनेचा बालेकिल्ला ठरणार? Pudhari
पुणे

Maharashtra Assembly Polls: कोथरूड पुन्हा उबाठा शिवसेनेचा बालेकिल्ला ठरणार?

माजी आमदारासह नगरसेवकामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघांवर पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील आठ मतदारसंघांपैकी एकमेव कोथरूड मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. महायुती संपुष्टात आल्यानंतर तसेच पक्षफुटीनंतर या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचा (उबाठा) चांगलाच कस लागणार आहे.

दरम्यान, येथून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार या दोघांची नावे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत मतदारसंघाचे नाव नसल्याने येथील उमेदवारीही अद्याप वेटिंगवर आहे. त्यामुळे शिवसेनेकडून (उबाठा) उमेदवार कोण? याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे.

शहरातील आठ मतदारसंघांपैकी हडपसर आणि कोथरूड अशा दोन जागा शिवसेना(उबाठा) गटाला मिळतील अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने हडपसरमधून माजी आमदार महादेव बाबर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) दावा ठोकत येथून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे, शिवसेनेच्या वाट्याला पुणे शहरात केवळ एकाच जागेवर निवडणूक लढविता येणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या (उबाठा) जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत किमान कोथरूड मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

मात्र, ती न आल्याने शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. कोथरूड मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपला टक्कर देत शिवसेनेकडून (उबाठा) गेलेला बालेकिल्ला भाजपकडून पुन्हा खेचून आणायचा असेल, तर शिवसेनेला (उबाठा) तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. सध्या शिवसेनेकडून (उबाठा) चंद्रकांत मोकाटे तर पृथ्वीराज सुतार अशी दोन नावे चर्चेत आहे.

पृथ्वीराज सुतार हे शिवसेनेचे नेते, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, शिवसेनेची (उबाठा) पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये 65 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या यादीत कोथरूड मतदारसंघातील उमेदवाराचे नाव नसल्यामुळे या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT