पुणे: महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन’ करण्यात केले. या वेळी ‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ या घोषणा देण्यात आल्या.
या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, प्रकाश भेगडे, उल्हास शेवाळे, अशोक खांडेभराड, संजय काळे, संतोष मोहोळ, स्वाती ढमाले, पद्मा सोरटे, विद्या होडे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशा भ्रष्ट, अंधश्रद्धा पसरवणार्या, डान्सबार चालवणार्या आणि जुगारात सामील असलेल्या मंत्र्यांना तत्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकावे किंवा त्यांचा राजीनामा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना राज्यभर अधिक आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, सध्याचे युती सरकार हे कलंकित सरकार असून ते जनतेची दिशाभूल करत आहे. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणार्या मंत्र्यांना सत्तेत ठेवणे म्हणजे लोकांचा विश्वासघात आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.