वाल्हे येथील शिवकालीन भवानीमाता मंदिर Pudhari
पुणे

Bhavani Mata Temple: वाल्हे येथील शिवकालीन भवानीमाता मंदिर

नवरात्रोत्सवात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हेनगरीमध्ये (ता. पुरंदर) पूर्वेकडे डोंगरावर असणाऱ्या ‌‘शिवकालीन भवानीमाता मंदिरा‌’त नवरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो. मंदिरात घटस्थापना केल्यापासून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

दरवर्षी येथे कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. वाल्हे येथील पंचक्रोशीतील आराध्यदैवत असलेल्या डोंगरावरील शिवकालीन भवानी मातेचे मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदेवतेपैकी एक असलेल्या भवानी देवीला समर्पित आहे आणि देवीची भक्तांकडून पूजा केली जाते. यास ‌‘तुकाई माता‌’ असे देखील म्हणतात. (Latest Pune News)

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई केली असून, मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार ग्रामस्थांनी लोकसहभागातून केला आहे. मागील दोन वर्षांपूर्वीच दुरगुडे परिसरातील सदस्यांनी मंदिरांच्या शिखराच्या कामांसाठी मोलाचे सहकार्य करून काम पूर्णत्वास नेले आहे.

भवानी माता डोंगर परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. डोंगरावर पथदिवे, चढण्यासाठी पायऱ्या, गाडीसाठी रस्ता, विविध प्रकारची झाडे, फुलझाडे व इतर सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाल्हे येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी माहेरवासिनी महिला आवर्जून येत असतात.

पाचव्या माळेपासून वाल्हे, वीर, जेजुरी, राख, परिंचे, नवलेवाडी, राऊतवाडी, माहूर, मांढर, हरणी, निरा, पिंगोरी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, फलटण, लोणंद तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील अनेक भाविक मोठी गर्दी करतात. मंदिराची देखभाल वंशपरंपरेने रमेश भोसले, शिवलिंग, सकलावे, मनोज भोसले, सतीश भोसले, देविदास भोसले हे नित्यनेमाने करतात.

नवरात्रोत्सवात मंदिरात दररोज पहाटे साडेपाचच्या दरम्यान आरती करण्यात येते. नवरात्र काळात दोन प्रहरात देवाची पूजा, छबिन्यासह पालखीची मंदिर प्रदक्षिणा, भजन, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिवसभर देवीचा गायनाचा कार्यक्रम केला जातो. नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेच्या आरतीस भवानीमाता मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकभक्त उपस्थित राहतात.

मंदिराची आख्यायिका

छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या सईबाई यांना मोगलांपासून वाचवण्यास वाल्हे येथील चर्मकार समाजाने आश्रय दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आठवण म्हणून त्यांनी भवानीमाता मंदिर बांधले असून संपूर्ण मंदिर हेमाडपंथी असून नवरात्रोत्सवात रात्रभर देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू असल्याचे देवीचे पुजारी अनुराधा देविदास भोसले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT