उमेश काळे
टाकळी भीमा : शिरूर तालुका पंचायत समितीसाठी गणनिहाय आरक्षणात 14 पैकी 7 ठिकाणी महिलाराज आले आहे, तर शिरूर पंचायत समिती सभापतीपदाची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाली आहे. यामध्ये 7 ठिकाणी पुरुषांना संधी मिळाली असून, सर्वसाधारण जागेसाठी 5 ठिकाणी लढत होणार आहे.(Latest Pune News)
दोन गणात पुरुषांमध्ये अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी लढत होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये देखील महिलांसाठी आरक्षण आल्याने तालुक्यातील शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, रांजणगाव गणपती, न्हावरा या मोठ्या गावातील अनेक पुरुष दिग्गजांचे जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अनेकांनी आपल्या पत्नीला पुढे करत निवडणुकीचे रणांगण सुरू ठेवले आहे. तालुक्यातील सर्वत्र चौका-चौकात, पारावर कोणती जागा कुणाला सुटली, कोणता प्रभाग आरक्षित आहे, याची चर्चा सुरू झाली असून, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मात्र कोण लायक व सक्षम उमेदवार निवडणूक जिंकेल, हे शोधण्याची शोधमोहीम सुरू केली आहे.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सभागृहात आपलेच वर्चस्व राहावे यासाठी राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत आयाराम-गयारामची संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. शिरूर पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आल्याने अनेक दिग्गज इच्छुक उमेदवारांचे सभापतीपदाचे स्वप्न भंगले आहे. जिल्हा परिषद सभागृहात देखील तालुक्यातून महिला प्रतिनिधी नेतृत्व करणार आहे. महिलांसाठी अर्ध्यांपेक्षा अधिक जागा आरक्षित असल्या तरी त्यांचे पतीराज कारभार पाहतात असे काहीसे चित्र यापूर्वीदेखील राहिले आहे आणि यंदादेखील तसेच राहणार आहे. सत्येत येण्यासाठी आघाडी किंवा युती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी
आत्तापर्यंत अनेक सदस्य निवडून गेले, परंतु त्यांच्या कार्यकाळात म्हणावे तेवढे कर्तबदारीचे काम झाले नाही. त्यामुळे मतदार नाराज असून, निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी होत आहे. त्याच दृष्टिकोनातून राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या असून, नवीन उमेदवार देण्यासाठी विचारविनिमय केला जात आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, बहुजन विकास आघाडीसह अनेक राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. इच्छुकांनी राजकीय नेत्यांची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. परंतु, सर्व बाजूने विचार केल्याशिवाय कुणाचीही उमेदवारी जाहीर केली जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.