मंचर : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला दुधाचा टेम्पो मागून येऊन धडकल्याने टेम्पोतून प्रवास करणारे आई, मुलगा व नातवाचा अपघाती मृत्यू झाला. अष्टविनायक महामार्गावर कवठे (ता. शिरूर) येथे रविवारी (दि. 17) सकाळी 5 वाजता हा अपघात घडला. अपघातातील मृत हे वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) गावातील रहिवासी आहेत. या गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली. शांताबाई मकाजी वाजे (वय 65), ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय 35) व युवांश ज्ञानेश्वर वाजे (वय 7) अशी त्यांची नावे आहेत. (Pune Latest News)
वाजे कुटुंब हे मुंबई येथे वास्तव्यास आहे. रविवारी (दि. 17) त्यांच्या नात्यातील महिलेचा निघोज येथे वर्षश्राद्ध कार्यक्रम होता. त्यासाठी ते मुंबई येथून दुधाच्या टेम्पो (एमएच 16 सीडी 9819) मध्ये बसून निघोज येथे जात होते. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कवठे गावच्या हद्दीत बंटी ढाब्याजवळील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक (एमएच 42 बी 8866) ला टेम्पो मागून धडकला. त्यात शांताबाई वाजे, ज्ञानेश्वर वाजे, युवांश वाजे हे गंभीर जखमी झाले. यातील शांताबाई वाजे यांना मोशी येथील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी नेत असताना त्यांचे निधन झाले. ज्ञानेश्वर व युवांश यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. टेम्पोचालक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचे नाव कळू शकले नाही.
शांताबाई वाजे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात ज्ञानेश्वर वाजे, युवांश वाजे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आले. शांताबाई वाजे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे करून मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला. विक्रम बाळू निचित यांनी फिर्याद मंचर ठाण्यात दिली. या अपघातामुळे वडनेर बुद्रुक गावावर शोककळा पसरली. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.