शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या निमित्ताने शिरूर शहरात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळते. दोन्ही बाजुंनी नगरपरिषदेच्या निमित्ताने आंदोलने करण्यात आली, मात्र शहरातील प्रश्न कायम आहेत. त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठीच ही आंदोलने सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय कारभाराविरोधात दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने घंटानाद आंदोलन केले. त्या वेळी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. शहरातील विविध प्रश्नांबाबत आवाज उठविला. तसेच शहरातील समस्या सोडवा, अन्यथा तीव आंदोलनाचाही इशारा दिला होता. (Latest Pune News)
यावर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मुज्जफर कुरेशी यांच्यावर जोरदार टीका केली. कुरेशी हे तीन वेळा नगरसेवक राहिले आहे. स्वतः अनेक समितीचे सभापती होते. मात्र ते सत्ताधारी असूनही त्यांना आंदोलन करण्याची गरज का आली? याचा अर्थ त्यांनी सत्तेमध्ये असताना काहीच काम केले नाही, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या घंटानाद आंदोलनाला महायुतीने मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांचा सत्काराने उत्तर दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीचा कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. यातून शहरातील विकासकामे मार्गी लागणार की, ते राजकीय फायदा घेणार, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
आता प्रत्येक पक्षाची राजकीय अस्तित्वाची धडपड सुरू आहे. गेल्या चार वर्षांत प्रशासकीय राजवटीत कुठलेही आंदोलन नागरिकांच्या प्रश्नासाठी झाले नाही. शहरात अनेक प्रश्न आहेत, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचेही नागरिकांनी या वेळी सांगितले.
ठेकेदार-अधिकारी यांच्यात युती
महायुतीतील व महाविकास आघाडीतील भांडणे ही समस्या सोडवण्यासाठी असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रशासकीय राजवटीतत कामाचे ठेके मिळवण्यासाठीच ही धडपड सुरू असल्याचे सांगितले जाते. प्रशासाकीय राजवटीत सर्व मैदान खुले असल्याने अनेक नवीन ठेकेदार व नगरपरिषदेतील काही अधिकारी यांची अभद्र युती या वादाला कारणीभूत असल्याची चर्चा शिरूरमध्ये आहे.
ठेक्यांसाठी राजकीय हस्तक्षेप
नगरपरिषदेच्या प्रांगणात सत्ताधारी महायुतीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते दिसतात. अनेक विभागात त्यांचा वावर वाढलेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील वादाला काँट्रॅक्ट मिळविणे हे कारण असल्याचे काही राजकीय जाणकारांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या अनेक कामांची चौकशी होऊन ते काम कुठल्या ठेकेदाराला दिले, त्याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली.
घंटानाद आंदोलनावर मनसे प्रवासी संघटनेचा आक्षेप
महाविकास आघाडीचे घंटानाद आंदोलन शिरूर नगरपालिका मुख्यालयाच्या आवारात झाले असून आजपर्यंत या आवारात आंदोलनाला कोणालाही परवानगी नव्हती तर मग या महाविकास आघाडीला कशी परवानगी दिली? असा प्रश्न करत याविरोधात आवाज उठविणार असल्याचे ‘मनसे’चे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी सांगितले.
बांडे व सय्यद यांनी सांगितले की, शिरूर नगरपालिका मुख्यालयापासून शंभर मीटर अंतरावर आंदोलनास परवानगी देण्याचा ठराव नगरपालिकेने केलेला आहे, तो ठरावही बेकायदेशीर आहे. परंतु, तो अस्तिवात असताना महाविकास आघाडीचे आंदोलन शिरूर नगरपालिका मुख्यालयाच्या आवारात कसे झाले.