शिरूर : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून शिरूर शहर विकास आघाडीने माघार घेतली आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय पटलावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आता शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवारांवर ऐनवेळी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. यातील काहींनी अपक्ष तर काहींनी एखाद्या पक्षाच्या चिन्हासाठी चाचपणी सुरू केली आहे.(Latest Pune News)
शिरूर शहराचा इतिहास पाहिला असता नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप सोडली तर इतर कोणतेही पक्षीय चिन्ह वापरले गेलेले नाही. आता शिरूर शहर विकास आघाडी आणि लोकशाही क्रांती आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यामुळे इच्छुकांची प्रचंड निराशा झाली आहे. त्यामुळे शहरात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांच्या इच्छुक उमेदवारांनी अपक्ष किंवा पक्षाचे चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या 2015 च्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. यासाठी आता कुठला पक्ष कोणाची उमेदवारी जाहीर करतो, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिरूर शहरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीतर्फे भाजपच्या इच्छुकांचा मेळावा सोमवारी (दि. 10) पार पडला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी दोन दिवसांपूर्वी इच्छुकांशी संपर्क साधत त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून आपण महायुतीबरोबर असून आमदार ज्ञानेश्वर कटके व भाजपचे राहुल पाचर्णे व नितीन पाचर्णे यांच्याशी बोलणे झाले आहे. आता जो काही महायुतीचा निर्णय होईल, त्याप्रमाणे सन्मानपूर्वक जागा शिंदे शिवसेनाला मिळतील अशी आशाही शिवसेनेच्या वतीने व्यक्त केली आहे. मात्र, महायुतीतर्फे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याही ठोस निर्णय झालेला नाही.
महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार अशोक पवार हेच निर्णय घेतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे माजी आमदार अशोक पवार निवडणूक लढविण्याबाबत निर्णय जाहीर करतील. सध्या तरी महाविकास आघाडीकडून कुठलीही घोषणा किंवा मेळावा किंवा या निवडणुकीबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे या निवडणुकी लढण्याबाबत एक-दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.