

जेजुरी : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी जाहीर केले.(Latest Pune News)
रविवारी (दि.9) दुपारी सासवड नगरपरिषदेच्या तसेच वीर-भिवडी व दिवे-गराडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. सायंकाळी जेजुरी नगरपरिषदेच्या तसेच बेलसर-माळशिरस व निरा-कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सासवड नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी चार, सदस्यपदासाठी 23, जेजुरी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी 9, सदस्यपदासाठी 40 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटांसाठी पाच, बेलसर गणासाठी दोन, माळशिरस गणासाठी चार उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. निरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटासाठी तीन, निरा गणातून एका उमेदवाराची, तर कोळविहीरे गणातून सहा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या वेळी पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश घुले म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येते. युती - आघाडीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. पण कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांनी या निवडणुका स्वबळावरच लढवण्याची तयारी केली आहे.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पक्षाची भूमिका मांडली. माजी आमदार संभाजीराव कुंजीर, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक जितेंद्र निगडे, अमित झेंडे आदी उपस्थित होते.
जेजुरी येथील कार्यकर्ते जयदीप बारभाई, संदीप जगताप यांनी जेजुरी नगरपालिका निवडणुकीबाबत भूमिका व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचे उपाध्यक्ष व निवडणूक निरीक्षक सुरेश घुले.