Bribery Case Pudhari
पुणे

Shirur ACB Trap: शिरूर पोलिस ठाण्यात एसीबीची मोठी कारवाई! एकाच दिवशी दोन हवालदार लाचप्रकरणी जाळ्यात

गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप; दुसऱ्या कारवाईत ९५ हजारांची लाच घेऊन हवालदार फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एकाच दिवशी शिरूर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदार लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली दोघांनी ही लाच मागितली होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकाच दिवशी सापळा कारवाई करण्याची पहिलीच घटना शिरूर पाेलिस ठाण्यात घडली.

पहिल्या कारवाईत ११ हजार रुपये घेताना पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले, तर दुसर्‍या कारवाईत ९५ हजार रुपयांची लाच घेऊन पोलिस हवालदाराने पळ काढळा आहे. सतीश नाथाराव मुंढे (वय ४६) असे लाच घेऊन पळून गेलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

शिरूर पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार मुंढे यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी मुंढेने १ लाख रुपयांची लाच मागितली.

त्याची तक्रार ३० सप्टेंबरला एसीबीकडे करण्‍यात आली. शिरूर पोलिस ठाण्यांतर्गत टाकळी हाजी पोलिस चौकीत या तक्रारीची पडताळणी केली. त्या वेळी मुंढेने स्वत:साठी व वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला १ लाख रुपये व नंतर तडजोडीअंती ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, ३० सप्टेंबरला रात्री टाकळी हाजी पोलिस चौकी येथे सापळा लावला. तक्रारदाराकडून सतीश मुंढेने ९५ हजार रुपये स्वीकारले. त्याच वेळी त्याला सापळा पथकाची चाहूल लागल्यावर तो लाचेची रक्कम घेऊन पळून गेला. त्याचा शोध घेतला जात असून, शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई जुने शिरूर पोलिस ठाण्यात ३० सप्टेंबरला केली असून, शिवाजी ज्योतिराम बनकर (वय ४४, रा. स्वप्नपूर्ती निवास, घोलेगाव रोड, शिरूर) असे अटक केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांच्या विरोधात शिरूर पाेलिस ठाण्यात १९ ऑगस्ट २०२६ मध्ये अतिक्रमण करून मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार शिवाजी बनकरकडे आहे. तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार बनकरने तक्रारदाराला १५ हजारांची लाच मागितली. तक्रारदारने अटकेच्या भीतीने बनकरला ५ हजार रुपये दिले.

बनकरने राहिलेले १० हजार रुपये घेऊन २९ सप्टेंबर रोजी बोलावले असल्याची तक्रार २९ सप्टेंबरला एसीबीला मिळाली. या तक्रारीची २९ सप्टेंबरला जुने शिरूर पोलिस ठाण्यात पडताळणी केली. त्यात तक्रारदाराकडून ४ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

जुने शिरूर पोलिस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी सापळा रचून तक्रारदाराकडून ११ हजार रुपये स्वीकारताना हवालदार बनकरला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या दोन्ही कारवाया पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT