

पुणे: येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्डाच्या स्वीमिंग पूलमध्ये बुधवारी रात्री क्लोरिन गॅसची गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली. पूलमध्ये पोहण्याचा सराव करणाऱ्या मुलांसह इतर नागरिकांना अचानक श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि उलट्या होऊ लागल्या. यातील १३ जणांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, काही तासांच्या उपचारानंतर सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे जलतरण तलावाची सुरक्षा आणि देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, घटनेनंतर पूलची दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी स्वीकारण्यास प्रशासन आणि कंत्राटदार दोघेही तयार नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात आहे. त्यामुळे क्लोरिन यंत्रणेची नियमित तपासणी आणि देखभाल नेमकी कोणाची जबाबदारी होती आणि गॅस गळतीची घटना कशी घडली, याचा तपास आता महत्त्वाचा ठरला आहे.
रुग्णालयातून पोलिसांना मिळाली माहिती
येरवडा पोलिसांना ३० सप्टेंबरच्या रात्री सुमारे १०.०५ वाजता सह्याद्री रुग्णालयातून घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शरद देठे आणि अन्य पोलिस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचीही पाहणी केली आहे.
तक्रार दाखल नसली तरी पोलिसांची चौकशी
सध्या कोणत्याही रुग्णाने किंवा त्यांच्या नातेवाइकाने कोणाविरुद्ध तक्रार दिलेली नाही. मात्र, पोलिसांनी घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली असून, क्लोरिन गॅसची गळती नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, क्लोरिन यंत्रणेची शेवटची दुरुस्ती आणि तपासणी कधी केली होती, तसेच देखभालीची प्रत्यक्ष जबाबदारी कोणाची होती, याचा तपास सुरू केला आहे.
मुलीला त्रास होताच वडिलांकडे धाव
कानिफनाथ भरणे यांनी सांगितले, ''माझी मुलगी बुधवारी पोहत असताना तिला अचानक त्रास झाला. ती धावत माझ्याकडे आली आणि मला त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर इतरांनाही त्रास होत असल्याचे दिसून आले. सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.''
नेमकी जबाबदारी कोणाची?
क्लोरिन गॅस गळतीनंतर प्रशासन आणि कंत्राटदारांकडून परस्परांवर जबाबदारी ढकलली जात असल्याने स्वीमिंग पुलाच्या देखभालीचा नेमका करार काय आहे, हा मुद्दा आता चर्चेत आला आहे. क्लोरिन टँक, पाइपलाइन, फिल्टर आणि गॅस प्रणालीची नियमित तपासणी कोणी करायची, दुरुस्तीचा खर्च कोणी उचलायचा आणि याबाबत पूर्वी कोणत्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दररोज पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांपैकी १३ मुलांना क्लोरिनमुळे त्रास झाला. त्यांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांनंतर सर्वांना रुग्णालयातून सोडले असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
- उमेश गित्ते (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे)
डीसीपी रजनीकांत चिलीमुला यांनी सांगितले की, सध्या तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, घटनेची माहिती स्टेशन डायरीत नोंदवण्यात आली आहे. ही घटना निष्काळजीपणामुळे घडली की अपघात होता, याचा तपास केला जात आहे.
- रजनीकांत चिलीमुला (पोलिस उपायुक्त)
क्लोरिन गळतीमुळे स्वीमिंग पूलमध्ये पोहत असलेल्या तसेच परिसरातील नागरिकांना त्रास झाला. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. स्वीमिंग पूलचा करार ज्या कंत्राटदाराकडे आहे, त्याची वेळोवेळी देखभाल करण्याची जबाबदारी आहे. मात्र, घटना घडल्यानंतर कंत्राटदार प्रशासनावर देखभाल न केल्याचा आरोप करत आहे. टँक आणि पाइपलाइनची स्थिती चांगली आहे. मोठ्या खर्चाची गरज भासल्यास प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिले जाते; मात्र नियमित देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराचीच आहे. कंत्राट रद्द करायचे की नाही, याचा निर्णय समिती घेईल.
- युवराज नाईक (विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)
गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाला टँक जुना झाल्याचे सांगितले आहे. फिल्टर आणि पाइपलाइनही खराब झाली आहे. मात्र, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. दुरुस्तीच्या कामासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, तो खर्च माझ्या आवाक्याबाहेर आहे. याबाबत पत्र देऊनही तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. घटना घडल्यानंतर कंत्राटदाराला जबाबदार धरणे चुकीचे आहे. प्रशासनाला याबाबत यापूर्वीच माहिती देण्यात आली होती.
- सतीश नाघे, कंत्राटदार.