शिरूर: शिरूर नगरपरिषदेची निवडणूक दि. 2 डिसेंबर रोजी पार पडल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दि. 21 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी ईव्हीएम मशिन पूर्ण बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.
शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह 24 जागेसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. निवडणुकीत तिरंगी लढत झाली असून, राष्ट्रवादी कॉंग््रेास, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष व भारतीय जनता पार्टी अशा तिरंगी लढतीत महायुतीतील तिसरा घटक पक्ष शिवसेना हा देखील काही ठिकाणी लढत देत आहे, तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि काँग््रेास पक्षाला अनुक्रमे दोन व एक जागा देण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले. अशी लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळाली.
निवडणुकीच्या बाबत शिरूर शहरात व राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू असून, या निवडणुकीसाठी 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैशाचा धुरळा उडाला आहे. राजकीय जाणकारांच्या मते हा आकडा यापेक्षा देखील जास्त जाऊ शकतो, कारण प्रत्येक पक्षाने प्रत्येक मताचे आर्थिक गणित जुळवत सहा ते सात हजार रुपये बाजार दिला. जवळपास 18 हजार मतदारांना हे आर्थिक गणित जुळले गेल्याने प्रत्येक पक्षाने एवढ्याच मतदारांना किंवा त्यापेक्षा जास्त मतदारांना ही रक्कम दिल्याने 30 ते 35 कोटी रुपयांची उलाढाल या निवडणुकीत झाली. तसेच अनेक इतर खर्च पकडून 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैशांचा येथे धुरळा उडाला, अशी चर्चा शिरूर शहरात दबक्या आवाजात सुरू असून, याला राजकीय तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे
या निवडणुकीच्या मोठी शासकीय यंत्रणा उभी करण्यात आली होती. एफएसटी टीम, भरारी पथक, शिरूर शहराबाहेर चार ठिकाणी तपासणी नाके उभे केले होते; मात्र या निवडणुकीत एकाही ठिकाणी पैसे पकडले गेल्याची घटना किंवा तक्रार दाखल नसून, किंवा भरारी पथकाने कुठेही कोणाची रक्कम पकडली असेही चित्र शिरूर शहरात कुठेही दिसले नाही.
कुठलीही शासकीय यंत्रणा या ठिकाणी जागृत दिसली नाही. पोलिस मात्र मतदारांवरच दादागिरी करताना दिसत होते. शिरूर नगरपरिषदेच्या या सार्वत्रिक निवडणूक सर्वात जास्त लोकशाहीची थट्टा यात पाहायला मिळाली.