Arrested Pudhari
पुणे

Shirur Milk Adulteration Case: दूध भेसळप्रकरणी २६ जणांवर गुन्हा; शिरूरमधील आरोपींच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह

मंचर पोलिस ठाण्यात कारवाईनंतर काही आरोपींना अटक; संबंधितांवर पुढील कारवाई कधी? नागरिकांकडून पोलिस प्रशासनाला जाब

पुढारी वृत्तसेवा

पिंपरखेड: दूध भेसळ प्रकरण उघडकीस आले तेव्हा मंचर पोलिस ठाण्यात २६ जणांवर गुन्हा दाखल करून काही आरोपींना तत्काळ अटक करण्यात आले; मात्र या गुन्ह्यातील शिरूर तालुक्यातील संबंधित आरोपी अद्याप समाजात खुलेआम फिरत असल्याची चर्चा असून, पोलिस प्रशासनाकडून त्यांच्यावर पुढील कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गंभीर स्वरुपाच्या या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीवर तातडीने कायदेशीर कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दूध हे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक अन्नपदार्थ आहे. त्यामुळे दूध भेसळीसारख्या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकरणात संबंधित विभागाने केवळ गुन्हा दाखल करण्यापुरती कारवाई न करता, भेसळीचा प्रकार नेमका किती मोठ्या प्रमाणात सुरू होता, त्यामागे कोण आहेत, दूध कोठून आणले जात होते आणि त्याची विक्री कोणत्या माध्यमातून केली जात होती, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.

मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित काही आरोपीवर अटकेची कारवाई झालेली नसेल, तर त्यामागील कारण काय, याबाबत पोलिस प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आरोपींना अटक न करण्यामागे तपासाची कोणती प्रक्रिया सुरू आहे का? पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे का? अथवा अन्य कोणते कायदेशीर कारण आहे, याची माहिती पोलिसांनी जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित विभागाची जबाबदारी काय?

दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित अन्न सुरक्षा यंत्रणेचीही महत्त्वाची भूमिका आहे. केवळ एखाद्या ठिकाणी नमुने घेऊन किंवा गुन्हा दाखल करून प्रश्न संपत नाही. भेसळ करणाऱ्या व्यक्तींचे जाळे, दूध संकलन-वितरणाची साखळी आणि या प्रकारातून होणारा आर्थिक व्यवहार याचा तपास होणे आवश्यक आहे. यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तालुक्यात नियमित तपासणी व दूध नमुना तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT