Police  Pudhari
पुणे

Shirur MD Drug Racket: शिरूरमध्ये एमडी ड्रग रॅकेटचा भांडाफोड; पोलिसाचाच सहभाग उघड

तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या नशेच्या बाजारावर विश्वासघाताची छाया

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: कोवळ्या पोरांचे भावविश्व उद्ध्‌‍वस्त करणाऱ्या एमडी ड्रगचे रॅकेट शोधताना पोलिस दलाने काही संशयित आरोपी उचलले आणि चौकशी करीत असताना आपलाच झारीतील शुक्राचार्य या रॅकेटचा हिस्सा असल्याचे पुढे आले. त्यानंतर नशेचा बाजार उद्ध्वस्त करण्याबरोबरच एका विकृत प्रवृत्तीच्या माणसामुळे संपूर्ण व्यवस्थेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलू नये, अशा दोन्ही पातळीवर पोलिस दलाला लक्ष ठेवून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एमडी ड्रगचा शिरूर तालुक्याला विळखा पडला आहे. तालुक्यातील ‌‘कोवळी पोरं‌’ नशेच्या सौदागारांनी हुडकून आपल्या जाळ्यात अडकवली आहेत. या पद्धतीचे वार्तांकन ऑक्टोबर महिन्यापासून दै. ‌‘पुढारी‌’मध्ये वेळोवेळी प्रकाशित झाले आहे. शिरूर तालुक्यामध्ये एमडी नावाच्या अमलीपदार्थाची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असल्याची व त्यामुळे अनेक युवकांचे आयुष्य बरबाद झाल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. मात्र, सामाजिक बदनामीला घाबरून किंवा त्यावर पडदा टाकून अनेकांनी हा प्रकार पोलिस ठाण्यापर्यंत जाऊ दिला नाही. परंतु, या नशेच्या भोवऱ्यात अनेक कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत.

केवळ 3 हजार रुपये तोळा या दराने हा पदार्थ सहज उपलब्ध होतो, या पद्धतीची माहिती आता लपून राहिलेली नाही. मागील दोन-तीन महिन्यांपासून पोलिस दलाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत अनेक जणांना गजाआड केले. मात्र, नव्याने होणाऱ्या प्रत्येक कारवाईत काही कोटी रुपयांचे एमडी जप्त केले जाते, याचा अर्थ हे रॅकेट खूप खोलवर जसे रुजले, त्याच पद्धतीने याची साखळीही खूप मोठी आहे, हे नक्की. शिरूर शहर, रांजणगाव औद्योगिक वसाहत व पुणे-अहिल्यानगर-शिरूर-सातारा रस्त्यावरील बहुतांश गावांतील युवापिढी या व्यसनाच्या आहारी गेली आहे.

सुदैवाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे व शिरूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा जप्त करण्यात आला. पाच आरोपी निष्पन्न झाले. मात्र, त्यामध्ये अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा गुजर नावाचा पोलिस हाच मास्टर माइंड असल्याचे उघड झाल्यानंतर सर्वसामान्य माणसापासून पोलिस खात्यापर्यंत सर्वांनाच धक्का बसला. पोलिसच जर नशेच्या बाजारात सक्रिय असतील, तर याला आळा कसा घालायचा? या पद्धतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शब्दाला मान असणाऱ्यांची मुले नशेखोरांच्या गळाला

सुगंधी सुपारीमध्ये ही पावडर घेतल्यानंतर झोप येत नाही, फेशपणा वाढतो आणि एनर्जी यांसारख्या प्रलोभनाला बळी पडून अनेक युवक या व्यसनाच्या गर्तेत अडकले आहेत. समाजामध्ये ऊठबस असणाऱ्या, गावगाड्यांमध्ये ज्यांच्या शब्दाला मान आहे, अशाच लोकांची पोरं या नशेच्या सौदागरांनी गळाला लावली. एमडी ड्रगचे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त व्हावे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या एमडी ड्रग प्रकरणात गुजर नावाच्या पोलिसाचे नाव पुढे आले आहे. त्याचे कृत्य हे आमच्या वर्दीची प्रतिष्ठा धुळीला मिळविणारे आहे. त्याच्यासारख्या विकृत प्रवृत्तीच्या माणसाला वर्दी म्हणजे काय, हेच कळले नाही. आमच्या पोलिस दलातील प्रत्येकाच्या मनावर या घटनेचे खूप खोलवर परिणाम झाले आहेत. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू व नशेचा हा बाजार उद्ध्वस्त करू.
गोविंद खटीक पोलिस उपनिरीक्षक, शिरूर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT