शिरूर: शिरूर शहरातील भर मध्यवस्तीत असणारा हलवाई चौक परिसरातील शहरातील प्रसिद्ध अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या सराफ दुकानावर पहाटेच्या सुमारास चार चोरट्यांनी दरोडा टाकत तब्बल १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. हा प्रकार बुधवारी (दि. २४) पहाटे चार वाजेच्या सुमारास ते साडेचार वाजेच्या दरम्यान घडला.
चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून व काचा फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ७६० ग्रॅम सोन्याचे दागिने व तब्बल ७७ किलो चांदीचे दागिने असा ऐवज चोरीस नेला. याबाबत वैभव पुरूषोत्तम जोशी (वय ४५, रा. सरदार पेठ, मोतीभवन, शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दागिन्यांमध्ये गंठण, चेन, राणीहार, टेंपल हार, अंगठ्या, कर्णफुले, पैंजण, जोडवे, वाळे अशा विविध प्रकारचे दागिने होते. (Latest Pune News)
चोरीला गेलेल्या ऐवजात
७६० ग्रॅम सोने (गंठण, चेन, राणीहार, अंगठ्या आदी, किंमत सुमारे ६८ लाख ५६ हजार रुपये), ७७ किलो चांदी (पैंजण, जोडवे, वाळे आदी, किंमत सुमारे ६९ लाख ८४ हजार १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपये) इत्यादी सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी झाली आहे. भर मध्यवस्तीत झालेल्या या चोरीच्या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बुधवार चोरटे पहाटे एका चारचाकी वाहनातून हलवाई चौक परिसरातील अमोल ज्वेलर्स या दुकानाजवळ आले. वैभव जोशी यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. पहाटे चारच्या सुमारास चोरटे गाडीतून दुकानात आले व बंद असलेले बंद दुकान फोडून आत प्रवेश केल्या. चोरीचा प्रकार समजल्यानंतर जोशी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले. पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान चोरटे ज्या बाजूने आले आणि गेले त्या परिसरातील रस्त्यावर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम पोलीस पथक करत आहे, त्याचबरोबर यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांकडेही तपास करत आहे. त्याखेरीज पुणे शहर, अहिल्यानगर व पिंपरी चिंचवड या परिसरातील अशा प्रकारचे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांकडे या संदर्भातला तपास करण्यात येत आहे.
पोलिसांचे एक पथक तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आहे. एकूण चार पदके त्यामध्ये ६ अधिकारी व २४ कर्मचारी चोरट्यांच्या शोध घेत आहे, असे पोलीस उपाधीक्षक प्रशांत ढोले यांनी सांगितले.
अमोल ज्वेलर्स शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या हलवाई चौक परिसरातील दुकान आहे. हा परिसर अत्यंत वर्दळीचा व सातत्याने रहदारी असणारा आहे.या परिसराच्या पुढील चौकामध्ये अनेक सोन्या चांदीचे दुकाने आहेत.
त्याचबरोबर किराणा मालाची व अन्य दुकाने आहे. शेजारी कापड बाजार आहे. अश्या गजबजलेल्या भागात पहाटेच्या वेळेस चोरीच्या झालेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.