

पळसदेव: नवरात्रोत्सवाला सोमवारी (दि. 22) सुरुवात झाली असून देवीभक्त नऊ दिवसांचे उपवास करत आहेत. त्यामुळे उपवासासाठी लागणारे साबुदाणा, शेंगदाणा, भगर आदी फराळ पदार्थांना मोठी मागणी वाढली आहे. यासोबतच बटाट्याचे व केळीचे वेफर्स, बटाटा चिवडा, साबुदाणा चिवडा, शेंगदाणा चिक्की, राजगिरा आदी तयार पदार्थांचीदेखील खरेदी वाढली असून त्याच्या दरात थोडी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कामाच्या व्यापामुळे महिलांना वेळ न मिळाल्याने तयार भगर पीठ घेण्याकडे कल वाढला आहे. केंद्र सरकारने जीएसटी दरात कपात केली असली तरी शहरी भागात किराणा मालाचे भाव थोडे कमी झाले आहेत, मात्र ग्रामीण भागात मात्र दर ’जैसे थे’च आहेत. (Latest Pune News)
यावर्षी दरवाढ झाली नसल्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. श्रावण महिन्यापासून उपवासाच्या पदार्थांच्या भावात बदल झालेला नाही. तयार भगर पिठाला जास्त मागणी असून साबुदाण्याची मागणी तुलनेने कमी आहे. दरम्यान, नवरात्रोत्सव संपेपर्यंत मोठी भाववाढ होण्याची शक्यता नसली तरी गोटा खोबऱ्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.