Pune Industrial Crime Pudhari
पुणे

Pune Industrial Crime: दादा, गुन्हेगारी चालायला नाही, पळायला लागली हो..!

गुन्हेगारीचा पाठिंबा घेऊन अनेक जण झालेत गब्बर; सार्वजनिक जीवनात मिळतोय मान

पुढारी वृत्तसेवा

बापू जाधव

निमोणे : शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी चालू देणार नाही, अशा पद्धतीचे जाहीर भाषण दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिरूर येथील जाहीर सभेत केले. दादांच्या या वक्तव्यानंतर टाळ्याही पडल्या. परंतु, दादा... या क्षेत्रात सध्या गुन्हेगारी चालायला नाही, तर पळायला लागली आहे, हे वास्तव आहे.

गुन्हेगारीची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला मिळत असणारे आव्हान त्यामुळे आता सामान्य माणसाने बोलणेच बंद केले आहे. उपमुख्यमंत्र्यांचे भाषण एका राजकीय व्यासपीठावर होते, जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ठेकेदारी मिळविण्यासाठी गुन्हेगारीचा किंवा गुन्हेगारांचा पाठिंबा घेऊन अनेक जण गब्बर झाले आहेत. त्यातील बहुतांश यथावकाश लोकांचे कल्याण करायचे, हा विचार मनी बाळगून राजकारणात सक्रिय झाले. कधी या पक्षात, तर कधी त्या पक्षात, जिथे जमेल तिथे त्यांनी आपले बस्तान बसवले. दादांचे विधान त्या मंडळींसाठी असेल तर सामान्य माणसाच्या पदरात काय पडणार? हा खरा प्रश्न आहे.

भंगार कामगार, वाहतूक ठेकेदारीसाठी अक्षरश: जीवघेणी स्पर्धा आहे. 15 ते 20 वर्षांपूर्वी ज्यांनी बस्तान बसविले, ते आज खोऱ्याने पैसा ओढत आहेत. गडगंज श्रीमंत झालेल्या या माणसांना सामाजिक प्रतिष्ठेचे वेध लागले आहेत. पैशाच्या जोरावर तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वतःचे स्थानही निर्माण केले आहे. आजच्या घडीला गुन्हेगार म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविण्याची ना सामान्य माणसांत हिंमत आहे, ना कायद्याच्या रक्षकांकडे.

आजच्या घडीला ही माणसे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आली, तर तो कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांची उंची वाढते, हे दिसून येत आहे. ठेकेदारीतून गडगंज पैसा मिळतो, हे पाहायला मिळत असल्यामुळे गुन्हेगारीवर श्रद्धा ठेवून अनेक जणांनी कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते रोखण्याचे आव्हान आजच्या घडीला पोलिस प्रशासनासमोर आहे. तालुक्यात फक्त ठेकेदारीच नाही, तर ड्रगचा विळखा पडला आहे. एमडीनामक ड्रगचा भस्मासुर कवळी पोरं उद्ध्‌‍वस्त करीत सुटला आहे. नशेचा बाजार मांडणारे बेफाम झाले आहेत. हे रॅकेट उद्ध्‌‍वस्त करण्याचे प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दीड वर्षात एकट्या शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 21 गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली. ही पिस्तुले येतात कशासाठी? याचाही कधीतरी विचार करण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारांचे आश्रयदाते व्हाइट कॉलर म्हणून समाजात वावरत असतील, तर त्यांना गजाआड करण्याची खाकीला मोकळीक द्या. गुन्हेगारांसाठी मांडवली करणारे व्हाइट कॉलर एकदा तरी कागदावर येऊ द्या. अनेक ठिकाणी अवैधरीत्या जमिनीवर ताबा ठोकणारे गुन्हेगार राजकीय वरदहस्तामुळे पोलिसी कारवाईपासून वाचतात. ‌’झाली असेल चूक साहेब, एकदा पदरात घ्या...‌’ असे म्हणणारी प्रवृत्तीच गुन्हेगारीला पाठबळ देते. या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची मानसिकता पोलिस यंत्रणेत येण्याची गरज आहे आणि त्यासाठी अजितदादा तुम्ही मनापासून लक्ष घालण्याची गरज आहे.

चांगला कार्यकर्ता उद्ध्वस्त करण्यासाठी ड्रगचा वापर

सार्वजनिक जीवनातील एखादा चांगला कार्यकर्ता उद्ध्वस्त करायचा असेल तर त्याच्या मुलाला ड्रगचे व्यसन लावा आणि त्याची दुसरी पिढी नशेच्या धुंदीत उद्ध्वस्त करा, अशा पद्धतीचे घाणेरडे कृत्य करणारी माणसे ही तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात व्हाइट कॉलर म्हणून वावरत आहेत. ही माणसे खड्यासारखी बाजूला करण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या सार्वजनिक जीवनाला एमडी ड्रगचा विळखा पडलाय, हे वास्तव आहे आणि हे उद्ध्वस्त करण्यासाठी वरिष्ठपातळीवरून लक्ष देण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT