Shirur Crime Pudhari
पुणे

Shirur Crime: शिरूर तालुका टोळीयुद्धाच्या उंबरठ्यावर! ‘भाईगिरी‌’च्या सामाज्यासाठी भररस्त्यात रक्ताची होळी

कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शिरूर तालुक्यातील सरदवाडी घाटात दिवसाढवळ्या घडलेल्या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल काळे याची त्याच्याच एकेकाळच्या साथीदारांनी महामार्गावर गाडी आडवी मारून अंदाधुंद गोळीबार करीत निर्घृण हत्या केली.

स्वतःच्या ‌‘भाईगिरी‌’चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारी जगतात ‌‘हवा‌’ करण्यासाठी हे टोळीयुद्ध आता उघडपणे रस्त्यावर आले असून, यामुळे शिरूर तालुका टोळीयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे.

मित्र बनले काळ; महेंद्र मल्लाव हत्याकांडातून मिळाली ओळख

सरदवाडी घाटात ज्या विशाल काळेचा खून झाला, तो आणि त्याला मारणारा मुख्य आरोपी सनी यादव व त्याची टोळी एकेकाळी एकत्र काम करीत होते. शिरूर शहरातील नामांकित नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची 7 ते 8 वर्षांपूर्वी भर लोकवस्तीत निर्घृण हत्या करून या टोळीने गुन्हेगारीविश्वात आपले पाय रोवले होते.

मल्लाव यांच्यासारख्या बड्या राजकारणी व्यक्तीच्या हत्येनंतर या टोळीचा दबदबा वाढला. हा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित असतानाच जामिनावर बाहेर आलेल्या या गुन्हेगारांनी पुन्हा एकदा शिरूरसह पुणे शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

पुणे-नगर रस्त्यावर गुन्हेगारांचा ‌‘नंगानाच‌’

जामिनावर सुटल्यानंतर स्वतःचे स्वतंत्र सामाज्य निर्माण करण्यासाठी या टोळीने हडपसर, चंदननगर, वाघोली आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नामचीन गुन्हेगारांशी हातमिळवणी केली. सद्य:स्थितीत या टोळीवर अपहरण, खून, खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ‌’संपूर्ण पुणे-नगर रस्ता ही आपलीच जहागीर आहे,‌’ अशा तोऱ्यात वावरणाऱ्या या विकृत गुन्हेगारांना वेळीच वेसण घातली नाही, तर तालुक्याच्या रस्त्यारस्त्यांवर यापुढील काळातही असाच नंगानाच पाहायला मिळेल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

महेंद्र मल्लाव यांच्या खुनानंतरच जर या गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कारागृहात सडवले असते, तर आज सरदवाडी घाटात विशाल काळेचा बळी गेला नसता. गेल्या चार दिवसांपासून मुख्य आरोपी सनी यादव पोलिसांना गुंगारा देत फरार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत संपूर्ण पोलिस यंत्रणा जंग जंग पछाडत असतानाही आरोपी हाती न लागणे, हे पोलिसांच्या अपयशाचे लक्षण मानले जात आहे.

राजकीय वरदहस्त की खाकीतच ‌‘झारीतले शुक्राचार्य‌’?

या गुन्हेगार टोळीला शिरूर आणि पुणे परिसरातील काही तथाकथित राजकीय नेते आणि बड्या व्यापाऱ्यांचा थेट आशीर्वाद असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे पोलिसांची एवढी मोठी यंत्रणा पाठीमागे लागलेली असतानाही सनी यादव चार दिवसांपासून फरार कसा राहू शकतो? या टोळीची पाळेमुळे यंत्रणेत किती खोलवर रुजली आहेत, याचा अंदाज यावरून येतो.

या गुन्हेगारांना पोलिसांमधीलच कोणी ‌‘झारीतला शुक्राचार्य‌’ माहिती पुरवून मदत करीत आहे का? असा संशयास्पद प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता वेळ आली आहे की, खाकी वर्दीने या गुन्हेगारांना पोसणारी ही ‌‘विषवल्ली‌’ मुळासकट उपटून टाकली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT