मांडवगण फराटा : कांद्याच्या दरातील घसरण व निर्यात धोरणामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. २२) नवी दिल्लीतील कृषी मंत्रालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले.
शेतकरी सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मचाले आणि नवनाथ फराटे यांनी गळ्यात कांद्याच्या माळा व खांद्यावर कांद्याच्या पोती घेतलेली प्रतीकात्मक वेशभूषा परिधान करून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या 'आर्थिक नग्नतेचा' निषेध नोंदवला.
कृषिमंत्री उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव अन्बलगन पी. यांची भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व संबंधित मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
यानंतर शेतकरी वाणिज्य मंत्रालयात निवेदन देण्यासाठी जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक करून संसद भवन कर्तव्य पथ पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी शेतकरी सागर फराटे यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री कार्यालयात निवेदन सादर करण्याची परवानगी दिली. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सायंकाळी मुक्त करण्यात आले.
या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी कांदा निर्यात धोरणातील बदल, किमान हमीभाव आणि झालेल्या नुकसानीची भरपाई याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे.