निमोणे: अंकशास्त्रात माहीर असणारा तथाकथित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या रासलीला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची धग थेट शिरूर तालुक्याला लागली आहे. या हाय प्रोफाईल तथाकथित धर्मगुरूच्या नादी लागून शिरूर तालुक्यातील अनेक मातब्बर लाखो रुपयांना डुबले असल्याची रंजक माहिती आता हळूहळू उघड होऊ लागली आहे.
कोट्यवधी रुपयांमध्ये खेळणाऱ्या काही आसामी आता कोटी नको, अरबो-खरबो रुपयांत आपण खेळले पाहिजे, राजकारणात आपला वारू तुफान धावला पाहिजे, यासाठी खरातच्या नादी लागले आणि बुडाले, हे आता उघड झाले आहे.
मुळातच कॅप्टन खरातकडे शिरूर तालुक्यातील जे भक्त जात होते, त्यांची कुंडली काढल्यानंतर ही सगळी मंडळी हाय प्रोफाईल मनी आणि मसल पॉवरवर प्रचंड पकड असणारी व त्यांच्या भागातील मातब्बर अशीच माणसे आहेत. शिरूर तालुक्यातील एका नामांकित राजकीय नेत्यावर खरात याने नाशिक जिल्ह्यातील वावी पोलिस ठाण्यात पाच कोटी रुपये मागतो, अशा पद्धतीचा गुन्हा काही दिवसांपूर्वी दाखल केला.
मात्र, याची दुसरी बाजू अशी आहे, तो नामांकित राजकीय नेता मनोभावे खरात याच्या आश्रमात मोठ्या श्रद्धेने जात होता. गंडा-दोरा किंवा अंगठीतले खडे ज्याची किंमत बाजारात अवघी शे-दोनशे रुपये आहे असे खडे कॅप्टन खरात याने कमीत कमी अडीच लाख व जास्तीत जास्त कितीही, या दराने या भक्तांना घेण्यास भाग पाडले.
नाव न छापण्याच्या अटीवर अनेक जण आता
दै. ‘पुढारी’शी मनमोकळे बोलू लागले आहेत. राजकारणात भरभराट व्हावी, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य यावे यासाठी या हाय प्रोफाईल महाराजाच्या दरबारात अनेक जणांनी माथा टेकवला. त्याच्या आश्रमात एका सिक्रेट रूममध्ये तंत्रविद्या करण्यासाठी त्यांने अतिशय भारावलेले वातावरण निर्माण केले होते, साक्षात परमेश्वराशी त्याचे थेट कॉन्टॅक्ट असल्याचे तो भासवत होता, विजेच्या उपकरणावर चालणारा खरा भासणारा नाग तो त्या विधीदरम्यान भाविकभक्तांना दाखवत असल्याने प्रत्येक जण मोहित होत होता.