Shirsufal Lake Encroachment Pudhari
पुणे

Shirsufal Lake Encroachment: शिर्सुफळ तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात!; 250 हेक्टरपेक्षा अधिक बेकायदेशीर अतिक्रमणे

तलावाच्या अस्तित्वावर धोका

पुढारी वृत्तसेवा

शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकर्‍यांनी तलावातील गाळ काढून जवळपास 250 ते 300 एकर क्षेत्रावर बेकायदेशीररीत्या शेती सुरू केली असून, त्यामुळे पाणीसाठा गंभीरपणे घटला आहे. या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष लक्ष्मण आटोळे यांनी खडकवासला जलसंपदा विभागाकडे केली आहे.

ब्रिटिशकालीन 834 एकर क्षेत्रफळाचा हा तलाव 1877 च्या दुष्काळात रोजगार हमी तत्त्वावर उभारण्यात आला होता. त्या वेळी 25 हजार 400 लोकांना काम मिळाले होते आणि अंदाजे 1.58 लाख रुपयांचा खर्च झाला होता. तलावाची पाणीसाठवण क्षमता 356.64 दशलक्ष घनफूट आहे. हा तलाव पूर्वी केवळ पावसावर भरत असे, परंतु 1980 नंतर खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध झाली. सध्या शिरसाई उपसा सिंचन योजनेद्वारे बारामती व दौंड तालुक्याच्या दुष्काळी भागात सिंचनासाठी पाणी सोडले जाते.

अतिक्रमणामुळे वाढते संकट

तलावात सध्या 14 फुटांहून अधिक गाळ साचला आहे. यामुळे साठवणक्षमता घटली असून, स्थानिक शेतकरी तलावातील गाळ काढून अतिक्रमित शेती करत आहेत. परिणामी, तलावाची उपयुक्तता कमी झाली असून, उन्हाळ्यात पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

तलावाची स्थिती आणि उपाययोजना

सध्या तलाव गाळ, झाडझुडपे आणि अतिक्रमणाच्या समस्यांमुळे संकटात आहे. पाणीसाठ्याचे प्रमाण घटल्याने स्थानिकांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने तलावाची मोजणी करून अतिक्रमण हटविण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिर्सुफळ तलावातील अतिक्रमण तातडीने हटवावे, अन्यथा आम्ही जलसंपदा कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. अतिक्रमण काढल्यास जलसंपदा विभाग आणि स्थानिक नागरिकांमध्ये उन्हाळ्यात होणारे पाण्याचे वाद निर्माण थांबतील. 125 एमसीएफटी पाणीसाठा राखल्यास ही समस्या सुटू शकते.
संतोष आटोळे, सामाजिक कार्यकर्ते, शिर्सुफळ
या अतिक्रमणाच्या विरोधात खडकवासला जलसंपदा विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अतिक्रमणासंदर्भात तहसीलदार व उपविभागाला माहिती देण्यात आली आहे. कार्यवाही सुरू असून, अतिक्रमण क्षेत्र सामाजिक वनीकरणासाठी देण्यात येणार आहे.
श्वेता कुर्‍हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT