राजगुरुनगर: अर्धवट कामांचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आजही बंद आहेत. पावसामुळे शिरोली-पाईट हा मुख्य रस्ता गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे लादवडपासून ते वांद्रेपर्यंतच्या 30-35 गावांना फटका बसला आहे. तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप देऊनही ठेकेदाराने अर्धवट राहिलेली कामे सुरू केलेली नाहीत.
सध्या शिरोली-पाईट ते आंबोली रस्त्यावर तीन चार ठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. चांडोली ते कडूस रस्त्यावरदेखील काही ठिकाणी पुलांचे व मुख्य रस्त्याचे चार पदरी करणाचे काम सुरू आहे. ठेकेदारांनी कामे मंजूर होऊनही कामे सुरू करायला मे महिना लावला. त्यातही सुरू केलेली कामे अंत्यत संथगतीने सुरू आहेत. (Latest Pune News)
शिरोली-पाईट ते आंबोली हा एकमेव रस्ता नागरिकांसाठी रहदारीसाठी उपलब्ध आहे. या रस्त्यावर तब्बल 40-45 गावे अवलंबून आहेत; परंतु पावसाच्या तोडावर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे अनेक रस्ते बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
लादवड येथे एका बड्या नेत्याच्या कुटुंबीयांची जमीन आहे. मुख्य रस्ता बंद झाल्याने नागरिक या जागेतून ये-जा करीत होते. परंतु, हा रस्तादेखील संबंधित जागेच्या सुरक्षारक्षकांनी बंद केला आहे. यामुळे नागरिकांना 7 ते 8 किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.
शिरोलीपासून आंबोली तब्बल 30-35 किलोमीटर अंतरावर आहे. आमच्या गावाला पोहचेपर्यंत फार मोठे दिव्य पार पाडावे लागते. शिरोली - आंबोली रस्त्यावर तीन ठिकाणी पुलांची कामे सुरू आहेत. चार - पाच ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते अर्धवट खोदून ठेवले आहेत. काही ठिकाणी दोन्ही बाजूचे रस्ते खोदले आहेत. ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांना अनेक अडथळे पार करत प्रवास करावा लागत आहे.- वैभव खुटवड, आंबोली ग्रामस्थ