वडगाव शेरी: वडगाव शेरी येथील सैनिकवाडी स्काईट कॉलेज ते विद्यांकुर शाळेदरम्यान नव्याने डांबरीकरण केलेला रस्त्याची दोनच दिवसांमध्ये चाळण झाली आहे. या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेने वडगाव शेरी परिसरातील सैनिकवाडी येथे लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे काम केले होते. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तसेच रस्त्यावर पसरलेल्या खड्डीवरून दुचाकीस्वार घसरून पडत आहे. तसेच खड्ड्यांमध्ये आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. (Latest Pune News)
माजी नगरसेविका श्वेता गलांडे खोसे म्हणाल्या की, महापालिकेने तयार केलेला रस्ता दोनच दिवसांमध्ये उखडला आहे. यामुळे कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचे सिद्ध होत आहे. ठेकेदाराने या रस्त्याच्या कामासाठी वापरलेले साहित्य निकृष्ठ दर्जाचे असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी.
महापालिका प्रशासनाने या रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासावा. ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना कोणत्याही निकषांचे पालन केले नाही. या रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र दोन दिवसांतच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडणार असतील, तर ही नागरिकांच्या कररूपी पैशांची उधाळपट्टी आहे.
-श्वेता गलांडे, माजी नगरसेविका
डांबरीकरण केले त्याच दिवशी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे.
- मनोहर माळी, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, महापालिका