वेल्हे: मोसे, पानशेतसह बारा मावळ खोऱ्यातील मावळ्यांचे स्फूर्तिदैवत आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पानशेतजवळील शिरकोली (ता. राजगड) येथील शिवकालीन श्री शिरकाईदेवी देवस्थानाला राज्य शासनाने गुरुवारी (दि. ५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला.
याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या दर्जामुळे शिरकाई देवस्थानच्या विकासाला चालना मिळणार असून, देवस्थानला शिवकालीन वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी याबाबतचे शासन निर्णयाचे पत्र दिले आहे. 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने भाविक आणि पर्यटकांसाठी रस्ते, भक्तनिवास यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी श्री शिरकाई देवस्थानाला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा होता. त्यामुळे विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नव्हता. दुर्गम भागात देवस्थान असल्याने देवस्थानकडेही निधीची उपलब्धता मर्यादित होती.
त्यामुळे 'ब' वर्गाचा दर्जा मिळावा, यासाठी देवस्थानचे सचिव व शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ, कार्याध्यक्ष शिवाजी पडवळ, सुनील साळेकर, सुनील बोरगे, माउली साळेकर, नामदेव पडवळ, शंकर पडवळ, दत्तात्रय पासलकर, पांडुरंग मरगळे, बाळासाहेब भोसले, बिपीन पासलकर, सुनील पासलकर, पंढरीनाथ भोसले, वसंत पासलकर, मारुती साळेकर, संतोष पडवळ आदी विश्वस्त आणि ग्रामस्थ अनेक वर्षांपासून मागणी करत होते.
आमदार राहुल कुल व माजी आमदार संग्राम थोपटे यांनी याबाबत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागाने सर्व बाबींची छाननी करून शासनाकडे 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर केला होता.
त्यानंतर शासनाने या दर्जाला मान्यता दिल्याने शिरकाईदेवीच्या लाखो भाविकांना दिवाळीची भेट मिळाली आहे. देवीच्या यात्रा आणि सण-उत्सवांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्याही वाढली आहे.
देवस्थानचे सचिव अमोल पडवळ म्हणाले, भाविक, पर्यटक आणि यात्रेकरूंना चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. देवीचा शिवकालीन व प्राचीन महिमा सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल.
देवस्थानच्या विकासाला गती मिळणार असून, मंदिर व परिसराची शिवकालीन शैलीत पुनर्बांधणी आणि बांधकामे करण्यात येतील. तसेच भाविक व पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे साडेतीनशे वर्षांनंतर देवस्थानला पुन्हा शिवकालीन वैभव प्राप्त होईल.