

शिर्सुफळ: शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन गुरुवारपासून (दि. ५) सुरू झाले आहे. सुरुवातीला ५ पंपांद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला असून, सहावा पंप गुरुवारी संध्याकाळी सुरू करण्यात येणार आहे.
या आवर्तनातून लाभक्षेत्रात १६० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता किरण तुपे यांनी दिली. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगाम वाया गेला. पावसाअभावी रब्बीच्या पेरण्याही होऊ शकल्या नाहीत. जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरींच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले.
मात्र, विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला होता. त्यामुळे शिरसाई योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती.
या मागणीसाठी नुकतेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उंडवडी सुपे येथे चक्री उपोषण केले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिष्टमंडळाला मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन देतकरण्याचे सांगितले होते. त्यानंतर आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
येत्या १५ दिवसांत कालव्याद्वारे १६० दशलक्ष घनफूट पाणी लाभक्षेत्रात सोडण्यात येणार आहे. हे पाणी परिसरातील पाझर तलाव, माती नाले आणि सिमेंट बंधाऱ्यांमध्ये साठणार असल्याने जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊन त्या पुन्हा पाण्याने भरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
या आवर्तनाचा उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बऱ्हाणपूर, साबळेवाडी, गाडीखेल आणि शिर्सुफळ या गावांतील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणी मिळू लागल्याने चारा आणि ऊस पिकांना आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.