तळेगाव ढमढेरे: शिक्रापूरचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिक्रापूरसह सणसवाडी येथे वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तीन दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून, दोन दारू अड्ड्यांवर छापे टाकून गावठी दारू जप्त केली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेळ नदीच्या कडेला वेगवेगळ्या ठिकाणी तसेच सणसवाडी येथे पाझर तलावाजवळ काही जण गावठी दारूची निर्मिती करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली.
त्यानंतर गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर, वेरणनाथ मुत्तनवर, पोलिस हवालदार उद्धव भालेराव, गणेश करपे, सचिन होळकर, संदीप कारंडे, शिवाजी चितारे, राकेश मळेकर, ललित चक्रनारायण, विकास बांगर, शरद धूरपते, सुजीत जगताप यांनी शिक्रापूर व सणसवाडी येथे छापे टाकत तीन दारूभट्ट्यावर कारवाई करत तेथील गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. सणसवाडी येथील दोन दारू अड्ड्यांवर छापे टाकत गावठी दारूसाठा जप्त केला.
याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी प्रेमशक्ती अभिमन्यू माननावत (वय 36, रा. सराटेवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर), अंकुश नानावत (रा. सणसवाडी, ता. शिरूर), सोनी नीलेश परदेशी (वय 24, रा. भुजबळवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर), रवी मोरसिंग बिरावत, किशोर राजकमल बिरावत,
जालिंदर शिलोन बिरावत, चिरोल कनू करमावत, कार्तिक चंदरसिंग करमावत, विश्वरुप ऊर्फ शाहरुक राजकमल बिरावत, देवानंद सोपान नानावत, वाल्मिक शिलोन बिरावत, किशोर राजकमल बिरावत, मुन्ना बिरावत (सर्व रा. शिक्रापूर, ता. शिरूर), दुर्बाल शिलोन बिरावत (रा. कासारी फाटा, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.