पुणे; पुढारी वृत्तसेवा : आई-वडील कामावरून उशिरापर्यंत घरी पोहचले नाहीत म्हणून ती शोधात घराबाहेर पडली. मात्र, काही अंतर गेल्यानंतर रस्ता चुकली. एका नागरिकाने तिला पोलिस ठाण्यात आणून सोडले. त्यानंतर काही वेळात तिच्या घराचा पत्ता शोधून पोलिसांनी सुखरूप तिला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. सात वर्षांची विजया (नाव बदललेले) आपल्या आई-वडिलांसोबत मुंढवा परिसरात राहते. हातावरचे पोट असल्यामुळे आई-वडील दोघे कामावर जातात. रात्री 9 वाजले तरी उशिरापर्यंत आई-वडील घरी परत आले नाहीत म्हणून अस्वस्थ होऊन त्यांच्या शोधासाठी घराबाहेर पडली.
पुढे आल्यानंतर घराचा रस्ता चुकल्यामुळे ती एस.बी.सी. रोड सीएनजी पंपाजवळ पोहचली. रात्री उशिरा एकटीच मुलगी फिरते आहे हे तेथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. त्यांनी तिला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, तिला घराचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगता येत नव्हता. महिला पोलिस कर्मचारी हेमलता गावडे आणि पोलिस कर्मचारी संदीप गर्जे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दीड तास परिसर पिंजून मुलीचे घर शोधून काढले. इकडे घरी परतल्यानंतर मुलगी घरात दिसून न आल्याने तिचे पालक विचारात पडले होते. मात्र, अचानक तिला पोलिस घरी घेऊन आल्याचे पाहून त्यांना हायसे वाटले.
हेही वाचा