पुणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही फूट पडणार किंवा हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा चर्चा जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्ष फूट तसेच विलीनीकरणाच्या सर्व चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची एक महत्त्वाची बैठक शनिवारी (दि. ४) शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. संघटनात्मक बांधणी व आगामी रणनीती ठरवण्यासाठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालय येथे या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या अस्तित्वासह विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत शिंदे म्हणाले, की आमचा पक्ष सध्या खूप चांगले काम करत आहे. त्यामुळे विलीनीकरण किंवा काँग्रेसमध्ये जाणे असा कुठलाही विचार आमच्या पक्षात नाही. मी अनेकदा सांगत आहे की आमचे लोक कुठेही जाणार नाहीत, आता त्यासाठी शपथा घेऊ का? असेही ते म्हणाले केली.
दरम्यान, विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरण्यासाठी आणि पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी पक्षाने नवा कार्यक्रम आखला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बैठका घेतल्या जातील आणि संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी काम केले जाईल.
काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष शिंदे?
आम्ही सर्व जण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार.
खासदार अमोल कोल्हेंच्या पक्षांतराच्या वावड्यांमध्ये काहीही तथ्य नाही
पक्षांतराच्या चर्चांवर खासदार कोल्हे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
कंत्राटी पद्धतीमुळे राज्यात सुरू असलेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची.
सध्याच्या सरकारकडून फक्त कंत्राटदार सांभाळण्याचे काम सुरू आहे.
अधिवेशनात मंजूर झालेली मोठी कामे सत्ताधाऱ्यांकडून फक्त मर्जीतील लोकांसाठी.
रामाचं नाव घेऊन सत्तेत सहभागी व्हायचं आणि नंतर पैसा कमवायचा हा नवीन प्रकार सुरू झाला आहे.