पुणे: सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणाने सध्या महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे अटकेत असताना त्याचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट झाले आहे.
पोलिसांच्या अटकेत असलेल्या व्यक्तीचा मोबाइल कोण वापरत आहे? हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. शशांकचं अकाउंट नेमकं कोणी डिलीट केलं याचाही शोध पोलिसांना घेणे आव्हानात्मक आहे.(Latest Pune News)
अजित पवारांनी साधला संवाद
अजित पवारांचा कस्पटे कुटुंबीयांशी फोनवरून संवाद. लग्नाच्या वेळी मला कल्पना दिली असती तर मी लग्न होऊ दिलं नसतं. मात्र आता वैष्णवीला न्याय मिळवून देणार, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन जीवन संपवले; मात्र सुनेच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्यामुळे सासारच्यांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी (दि. 16) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
वैष्णवी शशांक हगवणे (वय 24) असे जीवन संपवलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 26 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे; मात्र राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्याविरोधात हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. हुंड्यासाठी वैष्णवीचे आयुष्य संपवले, असा दावाही करण्यात आला आहे