खुटबाव : जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथील गिर्यारोहक असलेल्या चुलत बहिणींनी एका वर्षात तब्बल 57 किल्ले सर करून पराक्रम केला आहे. त्याच्या या कामगिरीचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व गिर्यारोहक क्षेत्रातील मान्यवरांकडून भरभरून कौतुक होत आहे. शर्वरी गणेश राजवाडे (वय 8) आणि मनस्वी महेश राजवाडे (वय 7) अशी या बहिणींची नावे आहेत.(Latest Pune News)
शर्वरीचे वडील गणेश राजवाडे यांना पहिल्यापासून गड-किल्ले सर करण्याची आवड आहे. मुलांनाही या ऐतिहासिक वास्तूंची माहिती असावी, त्यांनाही ट्रेकिंग करण्याची गोडी लागावी यासाठी गणेश राजवाडे यांनी त्यांची मुलगी शर्वरी व भावाची मुलगी मनस्वी यांना लहानपणापासूनच गिर्यारोहकाचे धडे देण्यास सुरवात केली. शर्वरी ही यवत येथील ज्ञानसिंधू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे, तर मनस्वी दुसरीत आहे. ऐतिहासिक किल्ले सर करण्याच्या मोहिमेत दोघींना शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गणेश जगदाळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. या सर्वांच्या प्रेरणेने शर्वरी आणि मनस्वी यांनी चिकाटी, धैर्य आणि इतिहासाबद्दलची जाणीव या सर्व गुणांचे दर्शन घडविले. व एका वर्षात रायगड, राजगड, तोरणा, अलंग, मदन, कुलांग, वासोटा, जीवधन, मोरगिरी, तुंग, तिकोना, हरिश्चंद्र गड, मोहन गड, कमळ गड, कावळा गड, रोहिडा यासह आदी तब्बल 57 किल्ले सर करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
दरम्यान, या दोन्ही मुलींनी राज्यातील विविध दुर्गम किल्ल्यांवर पाय ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहेत. भविष्यात आणखी किल्ले सर करण्याचा त्यांचा संकल्प असून ग्रामस्थांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
शर्वरी आणि मनस्वीचा ट्रेकींगचा प्रवास इथेच थांबणार नाही, तर त्यांना अनेक मोठे पल्ले गाठायचे आहेत. या दोघींना माझे मोठे बंधू गणेश राजवाडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. आत्तापर्यंत पूर्ण केलेल्या ट्रेकमागे त्यांची जिद्द आणि मेहनत आहे.महेश राजवाडे, मनस्वीचे वडील