पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका व्यक्तीची 97 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 47 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्ती हे कर्वेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. (Latest Pune News)
चोरट्यांनी त्यांना टेलीग्राम अॅपमध्ये अॅड करून घेतले. त्यानंतर एक लिंक पाठवून शेअर बाजारातील विविध योजनांविषयी माहिती दिली होती. सुरुवातीला व्यावसायिकाने थोडी रक्कम गुंतविली. गुंतवणुकीवर चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासाविले.
प्रत्यक्षात मात्र त्यांना परतावा देण्यात आला नव्हता. परतावा समाज माध्यमातील समुहात दिसल्याने व्यावसायिकाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी शेअर बाजारात आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. व्यावसायिकाने शेअर बाजारात गेल्या पाच ते सहा महिन्यात वेळोवेळी 97 लाख 50 हजार रुपये गुंतविले.
रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही, त्यानंतर त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने आणखी एकाची तीन लाख 67 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे नर्हे भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. परतावा देण्याच्या आमिषाने त्यांची फसवणूक केली. गुन्हे पोलिस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.
सेवानिवृत्त व्यक्तीला गंडा
सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सूर्यप्रभा गार्डन मार्केट यार्ड येथील एका व्यक्तीची 9 लाख 45 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी, 69 वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीला गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर त्यांना आर्थिक गंडा घालण्यात आला.