

शिरूर : जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा कहर चालू असतानाही फुलसांगवी साठवण तलाव रिकामाच राहिला होता. याही वर्षी भरेल की नाही अशी शंका असताना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजे मंगळवारी (दि.23) सकाळी या तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले. याचा आनंद जरी असला तरी सिंदफणा व गोदावरी पट्ट्यातील शेतकरी बांधवांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून अतिवृष्टीचा कहर शेतकऱ्याच्या मनाला वेदना देणारा ठरत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वरून राजाने अतिवृष्टीचे थैमान मांडले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास वरूण राजाने हिसकावून तर घेतलाच आहे परंतु गोदावरी सिंदफणाकाठीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यामुळे आपल्या काळी आईची कूस उध्वस्त झाल्याची वेदना शेतकऱ्यांच्या मनाला मोठी पीडा देणारी ठरत आहे. एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा कहर चालू असताना गेल्या आठवडाभरापर्यंत फुलसांगवी साठवण तलाव भरणे अपवाद राहिले होते.
जिल्ह्यातील सर्व छोटे-मोठे प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन नदीला नाल्यांना महापूर येत होता. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. अशा परिस्थितीतही फुलसांगवी साठवण तलावाची भूक भागली नव्हती. मात्र सोमवार दि. 22 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलसांगवी साठवण तलाव ओव्हर फ्लो होऊन ओसंडू लागला. याचा आनंद व्यक्त करण्या अगोदरच मंगळवार दि. 22 सप्टेंबर रोजी सिंदफणा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर जमीनीतील उभी पिके जमीन दोस्त होऊन शेतकऱ्याची काळी आई जात असल्याची उघडे डोळ्यांनी पाहायला मिळत होते. यामुळे प्रत्येकाच्या अंतकरणाला मोठ्या वेदना मिळत होत्या.
फुलसांगवी साठवण तलावाला प्रत्यक्ष सन 1999 मध्ये मंजुरी मिळाली होती. या तलावाचे सुमारे चार-पाच वर्षे काम चालू होते. सप्टेंबर 2006 मध्ये या तलावाचे काम पूर्णत्वास गेले होते. त्यानंतर गेल्या 19 वर्षात हा तलाव 2021 मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता व त्यानंतर या वर्षी पुन्हा एकदा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला पाहायला मिळत आहे.