पुणे: फुलांचे तोरण अन् सजावट, विद्युतरोषणाई अन् धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल... अशा आनंदी, उत्साही वातावरणात सोमवारपासून (दि. 22) शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे.
सकाळी विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने मंदिरांमध्ये घटस्थापना होणार आहे. घरोघरी आणि मंडळांमध्येही नवरात्रोत्सवाचा रंग अनुभवायला मिळणार आहे. दांडिया-गरबा कार्यक्रमांमुळे नवरात्रोत्सवास आनंद आणखी द्विगुणित होणार असून, आदिशक्तीच्या आगमनाने सगळीकडे आनंदी आनंद बहरला आहे. (Latest Pune News)
नवरात्रोत्सव म्हणजे चैतन्यमयी पर्व. यानिमित्ताने मंदिरे, घरोघरी, मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. विविध मंदिरांमध्ये सकाळी अभिषेक झाल्यानंतर घटस्थापना आणि महाआरती होईल, तर भजन-कीर्तनासह धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून, घरोघरीही नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिगीतांचे कार्यक्रम रंगणार आहेत. घरोघरीही विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने सकाळी घटस्थापनाहोणार आहे.
गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्रोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा केला जाणार आहे. यंदा नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे. सोमवारी (दि.22) घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास सुरुवात होईल. सकाळपासून दुपारी दोनपर्यंत घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.