माळेगाव कारखान्यासाठी शरद पवारांचा निर्णय होईना; ठोस भूमिका घेण्याची सभासदांची मागणी file photo
पुणे

Baramati News: माळेगाव कारखान्यासाठी शरद पवारांचा निर्णय होईना; ठोस भूमिका घेण्याची सभासदांची मागणी

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील आजच्या बैठकीकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी पार पडली. परंतु, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. प्रसारमाध्यमांना मात्र या वेळी दूर ठेवण्यात आले होते.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी आणखी चार दिवस बाकी असल्याने या गटानेही ’वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका ठेवली असल्याचे बैठक आटोपून बाहेर आलेल्या सभासदांकडून सांगण्यात आले. माळेगाव कारखान्याची निवडणूक कशी होणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. (Latest Pune News)

एकीकडे राज्य सरकारमध्ये महायुती एकत्रित सत्तेत असताना भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या दोन नेत्यांनी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कडवे आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा बळीराजा सहकार बचाव पॅनेलद्वारे निवडणुकीला सामोरे जाणार असे सांगण्यात आले होते.

प्रत्यक्षात वरिष्ठांकडून अद्याप त्यांना हिरवा कंदील दिला गेलेला नाही. रविवार (दि. 8)च्या बैठकीत यावर ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यात दोन दिवस वाट पाहून निर्णय करू, असे ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. खा. सुप्रिया सुळे या रविवारी बारामती दौर्‍यावर होत्या.

त्यांना यासंबंधी विचारणा करण्यात आली असता त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत निर्णय होईल. शिवाय आम्ही शेतकरी हिताचा निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या होत्या, मात्र रविवारी काहीच निर्णय झाला नाही.

माळेगाव कारखाना हा शरद पवार यांच्या नावाने ओळखला जातो, तुम्ही ठोस निर्णय घ्या, अशी भूमिका घाडगेवाडीतील एका सभासदाने शरद पवार यांच्यापुढे मांडली.

अजित पवारांकडून जबाबदारी निश्चित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर ते पुढील दौर्‍यासाठी मार्गस्थ झाले. परंतु, माळेगावबाबत कोणताही दगाफटका नको, यासाठी त्यांच्या ताब्यातील अन्य सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला सक्त सूचना केल्या आहेत. प्रत्येक सहकारी संस्था संचालकांवर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांनी कामाला लावले आहेत.

तावरे गुरू-शिष्यांचा प्रचार सुरू

ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांनीही आपला प्रचार सुरू ठेवला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 12 तारखेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे सध्या कोणताही पॅनेल आपली यादी जाहीर करायला तयार नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वातील नीलकंठेश्वर पॅनेलने मात्र थेट प्रचाराला सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT