पुणे

Sharad Pawar : जुन्या लोकांना सोबत घेण्यात साहेबांना यश; शरद पवार गटाची ताकद वाढणार?

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम समाजासह इतर समाजातही चांगला दबदबा आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. ते पुन्हा अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद साहजिकच वाढणार आहे. जुन्या लोकांना आपल्यासोबत घेण्यात साहेबांना यश मिळत असल्याचे हे उदाहरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत. अजित पवार हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. बदलेल्या या राजकीय परिस्थितीमध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी शरद पवार हे राज्य पिंजून काढत आहे. जाहीरसभा, मेळावे, सत्कार सोहळे आदी कार्यक्रमात सहभागी होत आहे.

अजित पवार वेगळे झाल्यानंतर त्यांच्यासोबत बहुतांश माजी नगरसेवक व पदाधिकारी गेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहेत. त्यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ नेते व पदाधिकार्‍यांना ते आवर्जून भेटत आहेत. त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. महाविकास आघाडी असताना शरद पवार यांनी शहराचा दौरा करीत ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन बंद दाराआड सविस्तर चर्चा केली होती. तसेच, विविध बैठका घेतल्या होत्या. त्यातून त्यांनी ज्येष्ठांसोबत कायम असल्याचा संदेश दिला होता.

राज्यातील राजकीय परिस्थिती बदल्यानंतर तसेच, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी दोन ते तीन वेळा शहराचा दौरा केला. शहरात आल्यानंतर कार्यक्रमापूर्वी आणि नंतर ते शहरातील ज्येष्ठांना आवर्जून भेटून चर्चा करत आहेत. त्यांना साद घालत आहेत. पुरोगामी विचारासोबत राहण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या या आवाहनाला यशही मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी नुकतीच शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यांना साथ देणार, त्यांच्यासोबत राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते शहरातील जुने व वजनदार असे नेते आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे ते काही महिने अज्ञातवासात होते. ते पुन्हा सक्रिय झाल्याने संभ्रमात असलेले शहरातील अनेक जण शरद पवार गटाचा मार्ग धरतील, असे चित्र आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकार्‍यांना होणार आहे.

जयंत पाटील यांनी घेतली पानसरे यांची भेट

आझमभाई पानसरे यांच्या प्राधिकरण, निगडी येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी अजित पवार गटाबरोबर गेलेले पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे हे ही उपस्थित होते. पाटील यांनी पानसरे यांच्यासोबत चर्चा केली.

आझमभाई पानसरेंमुळे पक्षाला ऊर्जा मिळणार

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. हिंजवडी आयटी पार्क त्यांच्या दृरदृष्टीमुळे निर्माण झाले. त्या माध्यमातून शेकडो युवकांना रोजगार मिळाला आहे. शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असणार्‍या लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शहरात पुन्हा ताकदीने उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची सोबत मिळाल्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळणार आहे. तसेच, शहरातील अनेक नेते व पदाधिकारी पक्षात येण्यास इच्छुक आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT