Sharad Pawar Pudhari
पुणे

Sharad Pawar: इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वयाचा प्रयत्न; कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये: शरद पवार

कर्जमाफी, शेतकरी नुकसान आणि आघाडीतील मतभेदांवर बारामतीत पवारांची प्रतिक्रिया; दिल्लीतील चर्चेवर लक्ष

पुढारी वृत्तसेवा

बारामती: देशात इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या पक्षांमध्ये सध्या चलबिचल सुरु आहे. विविध घडामोडी घडत आहेत, मतभेद होत आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक होत आहे. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी इंडिया आघाडीबाबत निश्चित मार्ग निघेल, कोणत्याही पक्षांनी टोकाची भूमिका घेवू नये, असे आवाहन केले.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, देशात राष्ट्रीय पक्ष एकत्र येण्याची गरज आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. दुसऱया बाजूला या नेतृत्वाशी असहमती असलेले पक्ष एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीच्या माध्यमातून देश पातळीवर काही पक्ष एकत्र आहेत. या घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये, असे मत आजच्या बैठकीत मांडले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहिल्या असून पुढील चर्चा दिल्लीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या कर्जमाफीबाबत पवार म्हणाले, कर्जमाफीच्या निकषामुळे शेतकरी नाराज आहे, यात तथ्य आहे. परंतु सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय उपयोगी नसेल तर लोकशाहीत सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती कशी करता येईल हे बघावे लागते.

माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री व दिल्लीतील नेत्यांशी बोलून कर्जमाफीच्या निर्णयात आवश्यक सुधारणा करता येतील का, याचा विचार केला जाईल. राज्यातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. विशेषतः केळी व ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले असून तज्ज्ञ व शास्त्रज्ञांची टीम पाहणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यवतमाळसह काही भागांत शेतकरी आत्महत्यांची समस्या गंभीर असल्याचे नमूद करत त्यांनी परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्षाची गरज असल्याचे म्हटले. अल निनोच्या संभाव्य परिणामांबाबतही सरकारने योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाविषयी ते म्हणाले, माझ्या वाचनात ते आले आहे. मी त्यांच्याशी बोलेन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT