बारामती : पुढारी वृत्तसेवा : आता जे लोक प्रचारासाठी गरागरा फिरत आहेत ना, ते 7 मे रोजी मतदान झाल्यावर तुम्हाला दिसणारही नाहीत. मग मी आणि तुम्हीच आहात, असे म्हणणार्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी खोटा ठरवला आहे. युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाची घडी बसविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (दि. 14) त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकसभा निवडणुकीनंतर एकप्रकारे शरद पवार गटाने आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीची सुरुवात केल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीत सुरुवातीला शरद पवार गटाकडे ना पदाधिकारी ना कार्यकर्ते अशी स्थिती होती. परंतु, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अवघ्या आठ-नऊ महिन्यात बारामतीत ही स्थिती बदलून टाकली. अजूनही या गटाकडे बारामतीत मातब्बर नेत्यांची कमी आहे. परंतु, सर्वसामान्यांना आकर्षित करून घेण्यात हा गट यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांना वारंवार लक्ष्य केले होते. शिवाय मतदान झाल्यावर ही मंडळी हवाई सफारीला जातील, मग तुम्ही व मीच बारामतीत असू, असेही वारंवार सांगितले होते.
त्याला छेद देण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्याकडून केला जात आहे. निवडणुकीनंतर सुळे यांनी बारामतीत थांबत मतदारांचे आभार मानले. मंगळवारी बारामतीत पक्ष कार्यालयात युगेंद्र यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती त्यांच्या उपस्थितीत येथे साजरी करण्यात आली. लोकसभा निवडणूक प्रचारा वेळीच या गटाच्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी यापुढील प्रत्येक निवडणुका ताकदीने लढल्या जातील, असे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटा- विरोधात सध्या तुल्यबळ असा शरद पवार हाच गट येथे कार्यरत आहे. या दोन्ही गटांच्या तुलनेत अन्य पक्षांची ताकद कमीच आहे. आगामी निवडणुकांवर शरद पवार गटाने आत्तापासूनच लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्ष कार्यालयात उपस्थित राहण्यावर भर दिला जात आहे.
हेही वाचा