पुणे : पु्ण्यात ऐतिहासिक शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यासह पतीत पावन संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. या परिसरात असलेल्या मजारवरून मेधा कुलकर्णी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनही करण्यात आले.(Latest Pune News)
पुण्यात शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा करत व्हिडीओ शेअर केला. यानंतर शनिवारवाडा परिसरात पतित पावन संघटना आक्रमक झाली. खासदार मेधा कुलकर्णीदेखील या वेळी आंदोलनात सहभागी झाल्या. आंदोलकांकडून परिसरात गोमुत्र शिंपडून जागा स्वच्छ करण्यात आली. यानंतर परिसरात असणाऱ्या एका मजारच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. ही मजार हटवा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. परिसरातील तणावाचे वातावरण पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
याबाबत राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, या ठिकाणी गोष्ट घडलेली आहे. हा व्हिडीओ खरा आहे. ज्या ठिकाणी नमाज पठण झालं त्या जागेचं आम्ही शुद्धीकरण करून शिववंदना घेण्यात आली. राज्य कारभार ज्या केंद्रातून चालवला गेला ते ऐतिहासिक ठिकाण शनिवारवाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली आणि मुघलांचा नाश केला. तेच इथे येऊन नमाज पढत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे, तुम्ही नाइलाजास्तव आपला स्वत:चा हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं असेल तर तुम्ही पुन्हा हिंदू धर्मात परत या.
अन्यथा, तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा. संबंधित महिलांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरातत्त्व विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर ही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कुलकर्णी यांनी या वेळी केली.