पुणे: राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीतील नोंदींमध्ये बदल करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. शालार्थ प्रणालीमध्ये नवीन पदनिर्मिती, नियुक्ती दिनांकात बदल तसेच आधारभूत माहितीतील (नाव, लिंग आणि जन्मदिनांक) दुरुस्ती करण्यासाठी आता एक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, त्यानुसारच ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक केले आहे.
पुणे विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील संबंधित शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना पत्र पाठविले आहे.
शालार्थ प्रणालीमध्ये पदनिर्मिती करण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव तयार करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक/ प्राथमिक) यांच्याकडे विहित नमुन्यात सादर करावा. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची तपासणी करून तो संबंधित वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांकडे पाठविणे अपेक्षित आहे. अधीक्षकांनी आवश्यक कागदपत्रांची आणि शालार्थ प्रणालीतील पदांच्या उपलब्धतेची पडताळणी करून प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सादर करावा.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती दिनांकात बदल करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावा. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करून संबंधित अधीक्षकांकडे पाठवावा. अधीक्षकांनी खातरजमा केल्यानंतर शालार्थ २.० प्रणालीमार्फत प्रस्ताव सादर करावा. याच पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या आधारभूत माहितीत म्हणजेच नाव, लिंग आणि जन्मदिनांक यामध्ये बदल करण्यासाठीही स्वतंत्र प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची आवश्यक कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या शिफारशी जोडणे बंधनकारक आहे.
ई-मेलद्वारे पीडीएफ स्वरुपात प्रस्ताव
प्रस्तावासोबत संबंधित शिक्षणाधिकारी तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांची स्वयंस्पष्ट शिफारस असणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव अधिकृत ई-मेल आयडीवरूनच dydpune.egov@gmail.com या ई-मेलवर पीडीएफ स्वरुपात पाठवावा लागणार आहे.